दता लोकरेसरवडे : अहो, ए.वाय. पाटील तुम्ही आणि के.पी. पाटील एकमेकांशी भांडत बसला आहात पण तुमच्या दोघांचाही खरा शत्रू कोण..? हे आधी ठरवा आणि मगच राजकीय वितंडवाद करा असा सल्ला माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी बुधवारी या दोन नेत्यांना दिला..दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या पाहुण्यांचा वाद विकोपाला गेला आहे. याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे असे असताना जाधव यांनी फोन करून या दोघांना सबुरीचा सल्ला दिला.सहकारातील अभ्यासू, संयमी नेतृत्व म्हणून बिद्री साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांची कारखाना कार्यक्षेत्रात व जिल्ह्यात ओळख आहे. वयोमानानुसार सध्या ते तिरवडे गावीच विश्रांती घेत असतात. मात्र गेले काही दिवस के. पी व ए. वाय यांच्या राजकीय संघर्ष त्यांच्या कानावर पडत आहे याची चर्चाही वाड्यात सुरू असते या पार्श्वभूमीवर पाडव्या दिवशी त्यांनी के .पी पाटील व ए.वाय पाटील यांना फोन करत सबुरीचा सल्ला देत त्यांना फटकारले.जाधव म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी आमचे तात्विक वाद आहेत म्हणून आम्ही तुमच्याशी अलीकडे जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ निवडणुकीत साथ केली. मात्र काही निवडणुका तोंडावर येत असताना दोघातील वाद कशासाठी, कुणासाठी हे ठरवा आणि शत्रू कोण हे ओळखा अन्यथा आम्हाला सुध्दा विचार करावा लागेल. के. पी. ना सुद्धा जिल्हा बँकेत संचालक करताना अनेकांनी विरोध केला. मात्र काही वेळा संस्थेचे हित, नवे नेतृत्व घडवताना जेष्ठांचा सल्ला पुढे उपयोगी असतो याची त्यांनी आठवण करून दिली.राधानगरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याला उमेदवारी मिळावी अन्यथा वेगळा विचार करू अशी उघड भूमिका दोनच दिवसांपूर्वी जाहीर मेळावा घेऊन स्पष्ट केली आहे. परंतू के.पी.पाटील या उमेदवारीवरील हक्क सोडायला तयार नाहीत..त्यातून पक्षातील या दोन नेत्यांत निवडणूकीच्या आधीच घमशान सुरू झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडगाव येथील कार्यक्रमात कोण गाडीत बसले आहे आणि नाही याचा विचार न करता विधानसभेची तयारी करा असा सल्ला के.पी.पाटील यांना दिल्याने त्यांचे मेव्हणे असलेले ए. वाय.पाटील संतप्त झाले आहेत..
अहो, ए.वाय तुमचा शत्रू कोण हे आधी ठरवा, माजी आमदार दिनकरराव जाधवांचा सबुरीचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 19:32 IST