अक्षय्यतृतीया आज
By Admin | Updated: April 27, 2017 18:06 IST2017-04-27T18:06:53+5:302017-04-27T18:06:53+5:30
आंबा खरेदीसाठी गर्दी

अक्षय्यतृतीया आज
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेसाठी कोल्हापूरची बाजारपेठ सज्ज झाली आहे. यानिमित्त पिवळ्याधमक आंब्याची खरेदी होत असून, व्यावसायिकांनीही मुहूर्त साधण्यासाठी नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत.
गुढीपाडव्याने वर्षातील मुहूर्ताला सुरुवात होते. त्यानंतर एक महिन्याने येणाऱ्या अक्षय्यतृतीया या अर्ध्या मुहूर्ताला खरेदी केली की कुटुंबाला अक्षय समृद्धी नांदते, अशी धारणा आहे. गुढीपाडव्याला आंब्याचे दर जास्त असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसतात. मात्र अक्षय्यतृतीयेपासून घरोघरी फळांचा राजा आंब्याचे आगमन होते. पुरणपोळी आणि आंब्याच्या रसाचा गोडवा पोटासोबत मनही तृप्त करतो. हा अर्धा मुहूर्त कॅश करण्यासाठी शहरातील व्यावसायिकांनीही तयारी केली आहे.
अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या शोरूममध्ये फ्रिज, कुलर, ए.सी. यासारख्या वस्तूंसह गृहोपयोगी वस्तूंचेही आगमन झाले आहे. या वस्तूंच्या खरेदीवर आणि एक्स्चेंजवरही आकर्षक योजना व बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीवर आणि एक्स्चेंजवर मोठी सूट देण्यात आली आहे. लग्नसराई सुरू आहे. याशिवाय मुहूर्ताला सोनेखरेदीच्या रूपाने गुंतवणूक करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या अलंकारांवर तसेच हिऱ्याच्या अलंकारांच्या मजुरीवर ब्रॅँडेड अलंकारांच्या शोरूमनी सूट जाहीर केली आहे.