जयसिंगपूरमध्ये बोलक्या भिंतीतून स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:46+5:302020-12-22T04:23:46+5:30
संदीप बावचे : जयसिंगपूर येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. बोलक्या भिंतीच्या माध्यमातून ...

जयसिंगपूरमध्ये बोलक्या भिंतीतून स्वच्छतेचा जागर
संदीप बावचे : जयसिंगपूर
येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. बोलक्या भिंतीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असून, या सर्वेक्षणांतर्गत सर्वोत्तम शौचालयाच्या उपक्रमाबरोबरच थ्री स्टार मानांकनासाठी पालिकेकडून तयारी सुरू झाली आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
जयसिंगपूर शहराने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गतवर्षी पश्चिम विभागात ५१ वे, तर महाराष्ट्रात ४१ वे स्थान मिळविले होते. २०२१ मध्ये सहा हजार गुणांची ही स्पर्धा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या अभियानात पालिकेने चांगले योगदान दिले आहे. ओडीएफ अर्थात हागणदारीमुक्त शहर हे मुख्य अभियान पालिकेने राबवून ओडीएफ मानांकन मिळविले आहे. सार्वजनिक शौचालयामध्ये कमोड, स्वच्छतागृह, वॉशबेसिन, फॅन, सॅनिटरी नॅपकीन विक्रीचे मशीन, डिस्पोजल मशीन, २४ तास पाणी, एलईडी दिवे, आरसा, साबण अशा सुविधा पुरवून सर्वाेत्तम शौचालयाचा उपक्रम पालिकेने आतापर्यंत राबविला आहे. हाच उपक्रम सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग काम करीत आहे.
दरम्यान, जानेवारी २०२१ मध्येही स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पालिकेने पुन्हा पुढाकार घेतला आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. ठिकठिकाणी बोलक्या भिंतीद्वारे स्वच्छतेबाबत सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे. पालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी घंटागाड्यांद्वारे नियोजन सुरू ठेवलेलेच आहे. नागरिकांनाही ओला व सुका कचरा वेगवेगळा घंटागाड्यांत टाकण्याची सवय झाली आहे. या स्वच्छ अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग तितकाच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
-------------
चौकट - पालिकेकडून उपाययोजना
शहरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने मशीन बसविले आहे. त्याचबरोबर बांधकाम कचरा संकलित करून त्यासाठी प्रक्रिया केंद्र देखील उभारले आहे. माझी वसुंधरा अभियानात देखील पालिकेने सहभाग घेतला आहे. एकूणच स्वच्छ सर्वेक्षण मानांकनासाठी पालिकेकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत.
फोटो - २११२२०२०-जेएवाय-०१, ०२
फोटो ओळ - ०१) जयसिंगपूर येथे बोलक्या भिंतीच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे.
०२) जयसिंगपूर येथे पालिकेच्यावतीने हायटेक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे.