मुरगूड पालिकेला ‘स्वच्छ अभियान’चा पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:58+5:302021-01-13T05:00:58+5:30
मुरगूड : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुरगूड (ता. कागल) नगरपालिकेला पाचवा क्रमांक मिळाला होता. हा ...

मुरगूड पालिकेला ‘स्वच्छ अभियान’चा पुरस्कार प्रदान
मुरगूड : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुरगूड (ता. कागल) नगरपालिकेला पाचवा क्रमांक मिळाला होता. हा पुरस्कार नुकताच पालिकेला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ अंतर्गत मुरगूड नगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली होती. नागरिक व पालिका कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने पालिकेचा देशातील पश्चिम विभागात पाचवा क्रमांक आला.
कोल्हापूर येथे आयोजित नगर परिषद व नगर पंचायत आढावा बैठकीत मुरगूड पालिकेला गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा पुरस्कार पालिकेकडे सुपूर्द केला होता. हा पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक मुरगूड नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेखान जमादार व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी स्वीकारला. यावेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्येही मुरगूड शहराने अशीच कामगिरी करावी, अशा शुभेच्छा शिंदे यांनी दिल्या.
या पुरस्काराबद्दल नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सर्व नगरसेवक, पालिका कर्मचारी व नागरिकांचे आभार मानले असून, स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ यशस्वी करण्याचे आवाहन केले. या पुरस्कार वितरणप्रसंगी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांच्यासह उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे, पालिका पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, मुख्याधिकारी संजय गायकवाड व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
फोटो ओळ : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ अंतर्गत देशपातळीवर मिळालेला पुरस्कार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष राजेखान जमादार व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी स्वीकारला.