अविनाश मोहितेंसह दोघांना अटक
By Admin | Updated: February 15, 2017 00:02 IST2017-02-15T00:02:16+5:302017-02-15T00:02:16+5:30
कृष्णा कारखाना बोगस कर्ज प्रकरण; पाच दिवसांची पोलिस कोठडी

अविनाश मोहितेंसह दोघांना अटक
कऱ्हाड : कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून मंगळवारी सकाळी कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. दुपारी पोलिस बंदोबस्तात त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, ‘साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्यानंतर या प्रकरणात ७८४ लोकांची ५८ कोटी ६३ लाख ९ हजार ३७१ रुपयांची फसवणूक झाल्याबाबतच्या माहितीची सत्यता आम्ही पडताळत आहोत,’ असे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी आली होती. याबाबत ऊस तोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. कृष्णा कारखान्याच्या २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्येकी सात लाख रुपयांप्रमाणे परतफेड करण्याची नोटीस बँक आॅफ इंडियाकडून पाठविण्यात आली होती. तांबवे येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनाही ही नोटीस २६ नोव्हेंबर २०१५ रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर यशवंत पाटील यांच्यासह अन्य ऊस वाहतूकदारांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावे कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले. संबंधित शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने संबंधित वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले.
याबाबत ४ आॅगस्ट २०१६ रोजी यशवंत रामचंद्र पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कृष्णा कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश जगन्नाथ मोहिते, उपाध्यक्ष सुरेश गणपती पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. या सर्वांनी २७३ जणांची १९ कोटी ३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे यशवंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
या फिर्यादीनंतर अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी गत महिन्यात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सोमवारी (दि. १३) दोघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला. सोमवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांनी अविनाश मोहिते व सुरेश पाटील या दोघांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघांनाही अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. गुंडे यांनी काम पाहिले.
बँक अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी
बँक आॅफ इंडियाने मंजूर केलेली कर्ज प्रकरणे, त्या कर्जाच्या वसुलीसाठी पाठविण्यात आलेल्या नोटिसा व कृष्णा शेतकरी व शेतमजूर सेवा संघाने त्या रकमेचे काय केले, या मुद्द्यावर सुरुवातीचा तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सांगितले.