मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न - अरुण नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:54+5:302021-02-05T07:13:54+5:30
(फोटो-०३०२२०२१-काेल- गोकुळ०२) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात महापूर, कोरोना यांसारख्या संकटांना तोंड देत, दूध उत्पादक सभासदांच्या ...

मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न - अरुण नरके
(फोटो-०३०२२०२१-काेल- गोकुळ०२)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात महापूर, कोरोना यांसारख्या संकटांना तोंड देत, दूध उत्पादक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र मूठभर विरोधकांकडे ताळेबंदावर एकही प्रश्न नव्हता, स्टंट करायचा म्हणून त्यांच्याकडून सभा उधळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सभाध्यक्ष अरूण नरके यांनी बुधवारी केला.
‘गोकुळ’च्या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नरके म्हणाले, सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे सभेच्या सुरुवातीलाच आपण आवाहन केले असताना काही मंडळींना दंगा करायचा होता. संपूर्ण सभेत ताळेबंदावर एकही प्रश्न नव्हता. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने जुन्या गोष्टींवर आग्रह धरणे योग्य नाही. जिल्ह्यातील दूध उत्पादक सुज्ञ आहेत.
संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, काटकसरीचा कारभार केल्यामुळेच संघाच्या २५० कोटींच्या ठेवी आहेत. भविष्यातील विचार करूनच विस्तारीकरण केले. त्यावेळी केले नसते तर आजचे १५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोठे करायची होती? मुद्दाच नसल्याने चांगल्या चाललेल्या दूध संघाच्या बदनामीचा उद्योग सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, उदय पाटील, सत्यजित पाटील, बाबा देसाई, अनुराधा पाटील, विलास कांबळे, रामराजे कुपेकर, अंबरीश घाटगे उपस्थित होते.
पिक्चर अभी बाकी है !
प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वच संचालक उपस्थित होते. यावर तीन संचालकांनी स्वतंत्र ठराव दाखल केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर, ‘पिक्चर अभी बाकी है,’ एवढीच प्रतिक्रिया अरुण डोंगळे यांनी दिली.
प्रवीणसिंहांकडे म्हैशी कोठे आहेत?
सभेनंतर बोलताना ‘बिद्री‘चे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी ‘गोकुळ’चे पशुखाद्य बनावट असून त्यामुळे २५ म्हैशी दगावल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार रुपये दिल्याचा आरोप केला. त्याबाबत विचारले असता, प्रवीणसिंहाकडे म्हैशी कोठे आहेत? अशी मिश्कील टिपणी रणजीतसिंह पाटील यांनी केली.
नरके यांच्याकडून घाणेकरांची पाठराखण
कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर हे ‘एनडीडीबी’चे सक्षम अधिकारी आहेत. त्यांच्यावर सर्व संचालकांचा विश्वास आहे. मात्र त्यांना काम तरी करू दिले पाहिजे, असे अरुण नरके यांनी सांगितले.