हा हल्ला म्हणजे नियोजनबद्ध कट

By Admin | Updated: February 27, 2015 00:17 IST2015-02-26T23:53:20+5:302015-02-27T00:17:35+5:30

रितेशकुमार यांची माहिती : थोडा वेळ द्या, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावूच

This attack is a planned conspiracy | हा हल्ला म्हणजे नियोजनबद्ध कट

हा हल्ला म्हणजे नियोजनबद्ध कट

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा नियोजनबद्ध कट होता; त्यामुळे मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात विलंब होत आहे. परंतु, आम्हाला थोडा वेळ द्या; प्रकरणाचा आम्ही नक्कीच छडा लावू, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गुरुवारी दिली.या हल्ल्याला दहा दिवस झाले तरी मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्याने पानसरे यांची मुलगी स्मिता सातपुते, स्नुषा मेघा पानसरे, जावई बन्सी सातपुते, दिलीप पवार, नामदेव गावडे, प्रा. उदय नारकर, एस. बी. पाटील, सतीशचंद्र कांबळे, आदींनी ताराबाई पार्कातील पोलीस महानिरीक्षक कार्यालयात रितेशकुमार यांची भेट घेतली.रितेशकुमार म्हणाले, पानसरे यांच्या हल्ल्यावरील तपास योग्य दिशेने आणि वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे. या हल्ल्यामागील एक जरी पुरावा सापडला, तरी त्याच्या आधारे आम्ही हल्लेखोरांपर्यंत पोहोचू. परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध २५ पथके कसून तपास करत आहेत. आणखी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. जरा वेळ द्या, निश्चितच मारेकऱ्यांना पकडू.डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले, अतिशय थंड डोक्याने व नियोजनबद्धपणे (गहिरी साजिश) हा खून करण्यात आला आहे. यामागे मोठे षड्यंत्र आहे. आम्ही तपासात कुठे कमी पडणार नाही, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. स्मिता सातपुते म्हणाल्या, ‘हा तपास गतीने व्हावा यासाठी आम्ही भेट घेतली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या तपासासारखा या तपासामध्येही खंड पडू नये. पुन्हा कुणी दाभोलकर, पानसरे होऊ नये ही यामागची भूमिका आहे. नामदेव गावडे यांनी, पानसरे यांच्या हल्ल्यामागे मोठ्या शक्तींचा हात असण्याची शक्यता वर्तविली.यावेळी संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब देवकर, आदींनी मते व्यक्त केली. यावेळी भरत पाटील, प्रा. आशा कुकडे, सुशीला यादव, एस. बी. पाटील, सुशांत बोरगे, सुभाष वाणी, हसन देसाई, अ‍ॅड. शिवाजी परुळेकर, आदी उपस्थित होते.

कारणांबाबत गैरसमज
मेघा पानसरे म्हणाल्या, ‘पानसरे यांचा खून कौटुंबिक वादातून झाला आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसे असेल तर पोलिसांनी ते जाहीर करावे. पानसरे यांच्या खुनाबाबत समाजात चुकीचा समज पसरत आहे, याबद्दल आम्ही नाराज आहोत, असे बन्सी सातपुते यांनी सांगितले.
गुन्हेगारच देतील माहिती...
पानसरे हल्ल्याची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने
२५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. ही रक्कम मोठी असल्याने गुन्हेगारी टोळीतील लोकांतूनच हल्ल्यासंबंधीची माहिती दिली जाईल, असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.


उमातार्इंच्या प्रकृतीत सुधारणा
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस चांगली सुधारणा होत आहे. पानसरे यांच्या मृत्यूची बातमी अजूनही त्यांना सांगण्यात आलेली नाही. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. ही माहिती अन्य कोणत्याही मार्गाने त्यांना समजू नये, यासाठी रुग्णालयाकडूनही काळजी घेतली जात आहे.

तर्कावर आधारित..
पानसरे हल्ल्याप्रकरणी काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या तर्कावर आधारित आहेत. त्याच्याशी पोलिसांचा काही संबंध नसल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.

Web Title: This attack is a planned conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.