हल्ल्याचा तपास पाच स्तरांवर सुरू
By Admin | Updated: February 21, 2015 02:09 IST2015-02-21T02:08:50+5:302015-02-21T02:09:02+5:30
अध्यक्षांकडे चौकशी : कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासह वादग्रस्त प्लॉटची पाहणी

हल्ल्याचा तपास पाच स्तरांवर सुरू
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याची व्याप्ती वाढली असून पोलिसांची तपास यंत्रणा ही सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक या पाच स्तरावर रात्रंदिवस काम करीत आहे. पोलिसांच्या एका विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासह संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील दोन गुंठे प्लॉटची पाहणी केली. या प्लॉटवरून एका झोपडपट्टी संघटनेच्या अध्यक्षाबरोबर पानसरे यांचा यापूर्वी वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी प्लॉटच्या पाहणीसह संघटनेचा एक ज्येष्ठ नेता व झोपडपट्टी अध्यक्षांकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे यांच्यावरील हल्ल्यापासून कोल्हापूर पोलिसांची झोपच उडाली आहे. रात्रंदिवस पोलिसांची वीस पथके तपास यंत्रणेत गुंतली असून प्रत्येक विषयावर ते चौफेर तपास करीत आहेत. ‘हल्ल्यामागचे कारण’ शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक या तीन स्तरांवर सर्व पातळ्यांवर माहिती घेण्याचे काम करीत आहे. तथापि, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही. याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. पानसरे यांच्या जवळचे नातेवाईक, मित्र, कार्यकर्त्यांकडे चौकशी करत असताना अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्या प्रत्येक प्रश्नांवर पोलीस कसोशीने काम करत आहेत. चौकशीमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीची खातरजमाही केली
जात आहे. मारेकऱ्यांचे रेखाचित्र
तयार केल्याने त्या वर्णनाच्या
सराईत गुन्हेगारांना पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)
आरोपींच्या शोधासाठी पथक शहराबाहेर
पोलिसांच्या एका विशेष पथकाने सकाळी बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासह संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील दोन गुंठे प्लॉटची पाहणी केली. या प्लॉटवरून एका झोपडपट्टी संघटनेच्या अध्यक्षाबरोबर पानसरे यांचा यापूर्वी वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी ही पाहणी केल्याचे
समजते. यावेळी संघटनेच्या एका ज्येष्ठ नेत्यासह झोपडपट्टी अध्यक्षाकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विविध पथके वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असून रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहराबाहेर आरोपींच्या शोधासाठी
गेले होते.
मोटारसायकलीबाबत गोपनीयता
पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याचा तपास करत असताना शहरात महत्त्वाच्या ठिकाणी तीन मोटारसायकली बेवारस स्थितीत मिळाल्या आहेत. हल्लेखोरांनी काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. पोलिसांना सापडलेल्या मोटारसायकलींमध्ये एक पल्सरही आहे. हल्ल्यामध्ये तिच वापरण्यात आली होती का ? याबाबत मात्र गोपनीयता पाळली आहे.