शैक्षणिक उदासीनतेवर हल्लाबोल

By Admin | Updated: January 14, 2015 00:45 IST2015-01-14T00:13:56+5:302015-01-14T00:45:10+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : आंदोलनात शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी सहभागी; शाळा बंद ठेवून केला निषेध

Attack on academic depression | शैक्षणिक उदासीनतेवर हल्लाबोल

शैक्षणिक उदासीनतेवर हल्लाबोल

कोल्हापूर : ‘हल्लाबोल, हल्लाबोल, सरकारच्या शैक्षणिक उदासीनतेवर हल्लाबोल’, ‘जाचक अटी रद्द झाल्याच पाहिजेत’, अशा घोषणा देत आज, मंगळवारी सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणक्षेत्र संघटना समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सुमारे आठ हजार शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी सहभागी झाले होते.
शासन दरबारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासह सरकारच्या शैक्षणिक उदासीनतेच्या निषेधार्थ असहकार आंदोलनातील दुसरा टप्पा म्हणून आज मोर्चा काढण्यात आला. शिवाय जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि खासगी प्राथमिक अशा ७५० शाळा बंद ठेवण्यात आल्या.
दुपारी सव्वाएकच्या सुमारास शहरातील गांधी मैदानातून मोर्चा सुरू झाला. घोषणा देत मोर्चा पुढे सरकत होता. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाले होते. खरी कॉर्नर, महाद्वार रोड, टाऊन हॉल, दसरा चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला.
या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन दिले.
यात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती राज्याध्यक्ष भरत रसाळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. बी. पोवार, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. एम. गायकवाड, बी. एस. खामकर, प्रभाकर आरडे, आर. डी. पाटील, दादा लाड, आदींचा सहभाग होता. या मोर्चाने संपूर्ण शहराचे अक्षरश: लक्ष वेधून घेतले होते. (प्रतिनिधी)

शिक्षक भरतीवरील बंदी, थकीत असलेले वेतनोतर अनुदान, आदींमुळे शाळा चालविणे जिकिरीचे बनले आहे. आमचे आंदोलन हे विद्यार्थी हितासाठी आहे. त्यात शिक्षकांच्या वैयक्तिक मागण्या नाहीत. प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा २ फेब्रुवारीपासून ‘बेमुदत शाळा बंद’ आंदोलन केले जाईल. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येईल.
- डी. बी. पाटील (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ)


सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने अनेक अन्यायी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक भरडले जात आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, शाळांचा दर्जा टिकावा, यासाठी प्रलंबित प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत.
- एस. डी. लाड
(सभाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ)

विवेकानंद शिक्षण संस्थेचा पाठिंबा
जिल्ह्यात आज झालेल्या शाळा बंद आंदोलन व मोर्चाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पाठिंबा दिला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे मोर्चात सहभागी झाले होते. त्यासह न्यू एज्युकेशन सोसायटी, डी. वाय. एज्युकेशन सोसायटी तसेच सांगली, साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेने पाठिंबा दिल्याचे महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितले.

मोर्चातील सहभागी संघटना...
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा महाविद्यालयीन प्राचार्य संघटना, जिल्हा पालक संघटना, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, जिल्हा शिक्षक परिषद, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघ, अशा वीसहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Attack on academic depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.