चंदगडमध्ये जातीय सलोख्याचे वातावरण
By Admin | Updated: July 10, 2015 21:54 IST2015-07-10T21:54:07+5:302015-07-10T21:54:07+5:30
१०० वर्षांची परंपरा : जामा मस्जिदीमधून समाजाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच न्यायनिवाडाही

चंदगडमध्ये जातीय सलोख्याचे वातावरण
नंदकुमार ढेरे - चंदगड -चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी दोन मस्जिदी असून, तालुक्यातील सर्वांत जास्त संख्येने मुस्लिम बांधव चंदगड येथे राहतात. या समाजामध्ये रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, नमाज पठण, रोजा, तरावीह पठण, दानधर्म, आदी धार्मिक उपक्रम या महिन्यात राबविले जातात.
चंदगड येथे १०० वर्षांची परंपरा लाभलेली ऐतिहासिक शाही जामा मस्जिद व दुसरी शहामदार मस्जिद आहे. ऐतिहासिक परंपरा आणि वारसा लाभलेल्या जामा मस्जिदीमधून समाजाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच न्यायनिवाडाही केला जातो. अमीरसाब हाजी अल्लाबक्ष मदार (तालुकाध्यक्ष), हिदायत लालसाब नाईक
(सचिव), ईस्माईल हुसेन मुल्ला (शहराध्यक्ष) व इतर जाणत्या लोकांचा समावेश असलेल्या समितीमार्फत मस्जिदीचे काम चालते. येथे दररोज पाचवेळा नमाज पठण होते. रमजान महिन्यात तरावीह पठण असते. मस्जिदमध्ये सामुदायिक रोजा इफ्तार होतो.
चंदगड येथील ऐतिहासिक परंपरा असलेल्या जामा मस्जिदीचा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला आहे; पण सध्या जागा अपुरी पडत असल्याने लोकवर्गणीतून पुन्हा आकर्षक अशी मस्जिद उभी करण्यात येणार आहे. याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. चंदगडसह माणगाव, तांबूळवाडी, कोवाड, तळगुळी, राजगोळी, अडकूर, तुर्केवाडी, निट्टूर, कोरज, डुक्करवाडी, नागनवाडी, कुदनूर, हेरे, तिलारीनगर, आदी २० गावांत मुस्लिम समाज राहत असून, या ठिकाणी देखील छोट्या-मोठ्या मस्जिदी आहेत.
नमाज पठण, तरावीह पठण, रोजा, इफ्तार, आदींसह विविध धार्मिक विधी होत आहेत. चंदगड पोलीस ठाण्यामार्फत इफ्तारचे दरवर्षी आयोजन केल जाते. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय नेते, कार्यकर्तेही हजेरी लावत असतात.
चंदगडमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये असलेला सलोखा तर वाखाणण्यासारखा आहे. एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमांत, वैयक्तिक सुख-दु:खात सहभागी होण्याची अनेक उदाहरणे फक्त चंदगडमध्ये पाहावयास मिळतात. दसरा, दिवाळी, गणेशोत्सवामध्ये जसे हिंदू धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरते, तसेच पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वातावरणाची अनुभूती पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मुस्लिम बांधव अल्लाहाच्या उपासनेत मग्न असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
‘जकात’ हा रमजान महिन्यात महत्त्वाचा घटक आहे. ‘जकात’ म्हणजे समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करणे. समाजातील ज्या लोकांकडे सात तोळे सोने व ५२ तोळ्यांपेक्षा अधिक चांदी असेल, अशा लोकांनी या संपत्तीच्या अडीच टक्के रक्कम दान करायची असते. तसेच माणसी पावणेदोन किलो गहू एकत्र करून गरीब व गरजू लोकांना वाटप केले जाते.