अथर्वच्या उपग्रहाची अंतराळात झेप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:46+5:302021-02-14T04:23:46+5:30
शिवानंद पाटील गडहिंग्लज : ऑनलाईन प्रशिक्षण आणि अवघ्या चार तासांच्या प्रयत्नातून येथील बालवैज्ञानिक अथर्व रवींद्र कदम याने बनविलेल्या ...

अथर्वच्या उपग्रहाची अंतराळात झेप !
शिवानंद पाटील गडहिंग्लज : ऑनलाईन प्रशिक्षण आणि अवघ्या चार तासांच्या प्रयत्नातून येथील बालवैज्ञानिक अथर्व रवींद्र कदम याने बनविलेल्या सर्वांत कमी आकाराच्या उपग्रहाने रामेश्वरम येथून अंतराळात यशस्वी झेप घेतली. त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्ड, एशियन बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड बुकसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकनेही घेतली.
इचलकरंजी येथील नातेवाईक संदीप पाटील यांनी अथर्वला पुण्यातील डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनची लिंक पाठवली होती. त्यातून त्याची रिसर्च पेलोड क्युब चॅनल २०२१ साठी बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली. आठ दिवसांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण त्याने घरातूनच घेतले.
दरम्यान, फौंडेशनतर्फे पुण्यात कार्यशाळा झाली. त्यासाठी महाराष्ट्रातील ३५० विद्यार्थ्यांमध्ये अथर्वचीही निवड झाली. त्याठिकाणी मिलिंद चौधरी व मोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १०० उपग्रहांचे रामेश्वरम येथून हेलीयम बलूनच्या साहाय्याने यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यात अथर्वच्या उपग्रहाचाही समावेश आहे. अथर्वला आई-वडिलांसह ‘किलबिल’च्या संस्थापिका अंजली हत्ती, मुख्याध्यापिका शहजादी पटेल, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
चौकट
* सर्वांत लहान उपग्रह !
उपग्रहांकडून ओझोनच्या थराचे निरीक्षण आणि अतिनील किरणांच्या तीव्रतेचे मोजमाप केले जाते, तर काही उपग्रहांमधून हवामानातील बदल आणि बीजांची उगवण याविषयी संशोधन केले जाणार आहे. अथर्वचा उपग्रह ८० ग्रॅम वजनाचा असून, ४ बाय ४ सेंटीमीटर आकाराचा आहे.
* आवडीमुळेच यश.....!
शाळेतील विज्ञान प्रदर्शन आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित उपक्रमातील सहभाग, तेथे केलेल्या छोट्या प्रयोगांमधून विज्ञानाची आवड निर्माण झाली. त्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले असल्याचे अथर्वने सांगितले.
कामगाराचा मुलगा..!
अथर्व हा गडहिंग्लज शहरातील किलबिल विद्यामंदिरात नववीत शिकतो. त्याचे वडील रवींद्र कदम (रा. हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) हे तांबाळे (ता. भुदरगड) येथील साखर कारखान्यात नोकरीला आहेत. घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आई महानंदा या घरीच खासगी शिकवणी घेतात.