अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : फळणीकरसह भंडारीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:21 IST2018-12-20T14:20:00+5:302018-12-20T14:21:35+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी याचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : फळणीकरसह भंडारीचा जामीन फेटाळला
कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी याचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी पुढील तारखेची विनंती केली होती. त्यास न्यायालयाने नामंजुरी दिली. दरम्यान, संशयित अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांच्या वस्तू खासगी लॅबकडून तपासणी करून घेऊ नयेत, असा अर्ज केला होता. तोसुद्धा न्यायालयाने फेटाळला.
बिद्रे हत्याप्रकरणी बुधवारी अलिबाग जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. राजू गोरे यांनी अश्विनी यांच्या वस्तूंची डीएनए चाचणी खासगी लॅबकडून करून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे पनवेल न्यायालयाने त्या वस्तू खासगी ‘ट्रथ’ या लॅबकडे वर्ग केल्या आहेत.
त्यांची टेस्ट खासगी लॅबकडून करून घेऊ नये असा अर्ज मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने वकिलामार्फत सत्र न्यायालयात दाखल केला होता. तो अर्जही न्यायाधीश मलशेट्टी यानी फेटाळला असून पनवेल न्यायालयाचा खासगी ट्रथ लॅबमध्ये डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आरोपीने कारागृह बदलाची मागणी केली आहे. त्याची सुनावणी झाली असून त्यावर अंतिम निर्णय २ जानेवारीला होणार आहे.