असंडोलीत पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी ओस
By Admin | Updated: January 14, 2015 23:43 IST2015-01-14T20:59:20+5:302015-01-14T23:43:01+5:30
३८ लाखांची इमारत : दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात सात गावे व २० वाड्यांचा समावेश; पशुपालकांची गैरसोय

असंडोलीत पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी ओस
साळवण : असंडोली (ता. गगनबावडा) येथे जिल्हा परिषदेमार्फत सुमारे ३८ लाख रुपये खर्च करून सुसज्ज असा श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना बांधला आहे. मात्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी या दवाखान्याचा कारभार मात्र निवडे-साळवण येथील शिपाईच बघत आहे. त्यामुळे अनेक जनावरांना उपचाराअभावी प्राणास मुकावे लागत आहे. या दवाखान्यात वरिष्ठांनी कायमस्वरूपी निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा, अशी कोदे खोरीतील पशुपालकांची मागणी आहे. या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात सात गावे व २० वाड्या येतात.या दवाखान्याचे उद्घाटन १४ जानेवारी २०११ रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर दवाखाना बंद स्थितीतच आहे. शिपाई दवाखाना उघडून बसतो.
श्रेणी १ चा दवाखाना असल्यामुळे या ठिकाणी १ एल.डी.ओ., १ परिचर, १ एल.एस.एस., १ शिपाई असे चार कर्मचारी असणे आवश्यक आहे; पण पूर्णवेळ काम करणारा सध्या एकही कर्मचारी या दवाखान्यात नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी जास्त दूध देणाऱ्या म्हशी खरेदी केल्या आहेत. डोंगराळ भाग असल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांचीही संस्था या भागात मोठी आहे. मात्र, दवाखान्यात वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे अनेकवेळा खासगी डॉक्टर्स किंवा ‘गोकुळ’च्या डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. वेळेत जनावरांना उपचार मिळत नसल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. कोदे येथील जनावर उपचारासाठी आणावयाचे झाल्यास १५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे शासनाने या भागाची गरज लक्षात घेऊन पूर्णवेळ निवासी कर्मचारी या दवाखान्यात नेमावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. दरम्यान, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी खान यांच्याशी संपर्क साधला असता वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शिपाईच त्या ठिकाणी औषधोपचार करीत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
येथील शेतकऱ्यांना खासगी डॉक्टर किंवा ‘गोकुळ’च्या डॉक्टरांवरच अवलंबून राहावे लागत आहे. तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे या भागातील अनेक जनावरे दगावली आहेत. ठराव केले, चारवेळा निवेदने दिली, तरी शासनाला जाग आली नाही. तत्काळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत.
- प्रकाश देसाई, उपसरपंच ग्रामपंचायत असंडोली.
जिल्हा परिषदेकडे सतत पाठपुरावा केला. अनेकवेळा सभागृहात प्रश्न उपस्थित केला. महत्त्वाची समस्या असतानाही या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून सर्व प्रकारचा औषधसाठा देणे गरजेचे आहे.
- मेघाराणी गुरुप्रसाद जाधव, जिल्हा परिषद सदस्या.