समीर देशपांडेकोल्हापूर : तब्बल पावणेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांत राजकारणाचा धुरळा उडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी हा मतसंग्राम होणार असून, या निवडणुकीत नव्या दमाने उतरणारे तरुण, तरुणी या निवडणुकीची रंगत आणखीनच वाढवणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत २०२६ च्या सुरुवातीला या निवडणुका लागणार हे गृहित धरून अनेकांनी तयारी सुरूच केली होती. त्याला आता वेग येणार आहे.महाराणी ताराराणी सभागृहात १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निघालेल्या सोडतीमध्ये परिषदेच्या ६८ जागांपैकी ४० जागा या सर्वसाधारण गटासाठी असून, त्यातील २० जागा खुल्या, तर १९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. १८ इतर मागाससाठी आरक्षित असून, त्यातही ९ महिला असतील. तर एससीसाठी ९ जागा आरक्षित असून, त्यातील पाच महिलांसाठी, तर एक जागा एसटीसाठी आरक्षित आहे. १९ मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपली.
वाचा : जिल्हा परिषदेला २३ लाख मतदारांना मतदानाचा हक्क, सर्वाधिक मतदार कोणत्या तालुक्यात...परंतु, त्यानंतर आरक्षणासह अन्य विषयांमुळे ही निवडणूक पुढे जात राहिली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतच घालून दिल्याने हा कार्यक्रम जाहीर करण्याशिवाय राज्य निवडणूक आयोगाकडे पर्याय राहिला नाही. त्यातही प्रभाग रचनेवरून काही महिने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात वाद-प्रतिवाद झाल्यानंतर हा आरक्षणाचा टप्पा पार पडला.आजऱ्याचा एक गट कमी; कागल, करवीरमध्ये वाढआजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक गट कमी झाला आहे, तर दोन गट अनुक्रमे कागल आणि करवीरमध्ये वाढले आहेत. आजऱ्याचा गट कमी होऊ देणार नाही, अशा घोषणा करण्यात आल्या. परंतु, त्यात यश न येता आजरेकरांचा एक जिल्हा परिषद सदस्य कमी झाला तो झालाच. उलट करवीर आणि कागलमध्ये एक-एक सदस्य वाढल्याने या दोन्ही तालुक्यांचे महत्त्व पुन्हा वाढले आहे. करवीर तालुक्यातून १२, तर हातकणंगले तालुक्यातून ११ सदस्य निवडून देण्यात येणार आहेत.
वाचा : जिल्हा परिषदेसाठी १२ निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा, तालुकानिहाय अधिकारी..जाणून घ्या
पावणेनऊ वर्षांनंतर निवडणूक, पावणेचार वर्षे प्रशासक राजवटजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक गतवेळी २०१७ मध्ये झाली होती. २१ फेब्र्रुवारी २०१७ रोजी मतदान झाले होते, तर २३ फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात पदाधिकाऱ्यांची निवड झाली. अडीच-अडीच वर्षांची ही राजवट होती. पहिल्या अडीच वर्षांत भाजपच्या शौमिका महाडिक अध्यक्ष झाल्या. परंतु, नंतर महायुतीला सत्ता राखता आली नाही आणि काॅंग्रेसचे बजरंग पाटील आणि राहुल पाटील हे दोन अध्यक्ष झाले. त्यानंतर १२ मार्चपासून पंचायत समित्यांवर, तर २० मार्च २०२२ पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाले.पावणेचार वर्षांत तीन प्रशासकगेल्या पावणेचार वर्षांत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या तीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले. यामध्ये पहिल्यांदा मुदत संपली तेव्हा संजयसिंह चव्हाण यांच्याकडे प्रशासक पदाचा कार्यभार आला. त्यानंतर संतोष पाटील हे प्रशासक होते, तर सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कार्तिकेयन एस. यांच्याकडे प्रशासक पदाचा कार्यभार आहे.
जिल्ह्यातील गट आणि गणसंख्यातालुका - गट - गण
- करवीर १२/२४
- हातकणंगले ११/२२
- शिरोळ ७/१४
- पन्हाळा ६/१२
- कागल ६/१२
- राधानगरी ५/१०
- गडहिंग्लज ५/१०
- चंदगड ४/८
- भुदरगड ४/८
- शाहूवाडी ४/८
- आजरा २/४
- गगनबावडा २/४
- एकूण ६८/१३६
पंचायत समिती सभापतिपद आरक्षण (अडीच वर्षांसाठी)१ शाहूवाडी- सर्वसाधारण (महिला)२ पन्हाळा- सर्वसाधारण३ हातकणंगले- अनुसूचित जाती (महिला)४ शिरोळ- अनुसूचित जाती५ करवीर- सर्वसाधारण६ गगनबावडा- सर्वसाधारण (महिला)७ कागल- इतर मागास (महिला)८ राधानगरी- सर्वसाधारण (महिला)९ भुदरगड- सर्वसाधारण१० आजरा- इतर मागास (महिला)११ गडहिंग्लज- सर्वसाधारण (महिला)१२ चंदगड- इतर मागासअध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षितजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने चुरस ही राहणारच आहे. प्रमुख नेते मंडळी आपल्या घरातील पत्नी, सून यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी याही वेळी आटोकाट प्रयत्न करणार हे नक्की. यातूनच सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या गटांमध्ये सामना चांगलाच रंगणार आहे. कोणतीही महिला ही निवडणूक लढवू शकते.मागील सभागृहातील पक्षीय बलाबल..
- काँग्रेस : १४
- भाजप :१४
- एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस : ११
- एकत्रित शिवसेना : १०
- जनसुराज्य शक्ती -०६
- ताराराणी आघाडी (महाडिक) : ०३
- शाहू आघाडी ( प्रकाश आबिटकर) ०२
- स्वाभिमानी शेतकरी संघटना : ०२
- ताराराणी आघाडी (आवाडे) : ०२
- युवक क्रांती आघाडी (कुपेकर) : ०२
- अपक्ष (रसिका पाटील) : ०१
- एकूण- ६७