कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण गणपतराव डोंगळे (घोटवडे) यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला असून, यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.अरुण डोंगळे हे गेली ३०-३५ वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या मागे ताकद उभी केली होती. तेव्हापासून ते शिंदेसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. मात्र, त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अभिषेक हे कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.मुंबईत झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी त्यांना प्रवेश दिला. यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी नेटाने कामाला लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीत पक्ष नंबर वन करण्यासाठी प्रयत्नशील राहू. - अरुण डोंगळे