कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गुरूवारी ताराबाई पार्कातील कार्यालयात राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व संचालक एकत्र येवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यामुळे आघाडीतील डोंगळे एकाकी पडले. डोंगळे यांचे अध्यक्षपद धोक्यात आले. शक्तीप्रदर्शनात विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक, चेतन नरके, बाबासाहेब खाडे गैरहजर राहिले.चार वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, आदींनी एकत्र येवून शाहू विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली. विरोधातील माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांच्याकडून आघाडीने सत्ता काढून घेतली. त्यानंतर विश्वास पाटील, अरूण डोंगळे यांना प्रत्येकी दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली. डोंगळे यांची मुदत संपत आल्यानंतर त्यांना नेत्यांनी अध्यक्षपदाचा राजीमाना देण्याचा आदेश दिला. मात्र त्यांनी महायुतीचे कार्ड पुढे करून राजीनामा देण्यास नकार दिला. गुरूवारी संघाच्या नियमित मासिक बैठकीसही ते गैरहजर राहिले. मात्र आघाडीचे विश्वास पाटील, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील - चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजीत मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, युवराज पाटील, राजेंद्र मोरे हे संचालक एकसंघपणे गोकुळच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात उपस्थित राहिले. त्यांनी आम्ही सर्वजण गोकुळ परिवार म्हणून आमच्या आघाडीचे सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करत आहोत. यापुढेही असेच काम करीत राहू, असे स्पष्ट केले.
Kolhapur: अरूण डोंगळेंचे अध्यक्षपद धोक्यात, गोकुळमध्ये शाहू विकास आघाडी एकसंघ
By भीमगोंड देसाई | Updated: May 15, 2025 13:46 IST