आर्त हाक... बरस रे घना!
By Admin | Updated: July 8, 2015 23:30 IST2015-07-08T23:30:34+5:302015-07-08T23:30:34+5:30
आभाळ आलंय... पण पाऊस कुठाय? : ३ लाख १७ हजार २७७ हेक्टर क्षेत्र तहानेने व्याकूळ

आर्त हाक... बरस रे घना!
सातारा : वरुणराजाने अचानकपणे दडी मारल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आभाळ आलंय; पण पाऊस कुठाय? आता बरस रे घना, अशी आर्त हाक बळीराजा मारू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप पिकाखालील तब्बल ३ लाख १७ हजार २७७ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके तहानेने व्याकूळ झाली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.
सोयाबीन, भुईमूग, भात, चवळी, मूग, घेवडा, हायब्रिड आदी प्रमुख पिके खरीप हंगामामध्ये घेतली जातात. पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी हंगाम उरकता घेतला. पावसाने जोरदार फटका दिल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. तर पूर्व भागातील शेतकरी अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणीसाठी खोळंबला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरुवातीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार ३ लाख १७ हजार २७७ इतके क्षेत्र खरीप हंगामासाठी राखीव ठेवलेले आहे. मागील आठवड्यात १ लाख ५३ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतरचा अहवाल अद्याप कृषी विभागाला प्रत्येक तालुक्यांतून मिळालेला नाही. त्यामुळे चालू आठवड्यातील पेरणीची माहिती मिळू शकली नाही.
ज्या क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत, ती पिके उगवून आली आहेत; परंतु कोवळे कोंब आकाशाकडे तोंड करून पावसाच्या थेंबांसाठी आसुसले आहेत. पिकांना पुरेसा पाऊस न मिळाल्यास कोवळी पिके करपून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. पावसासाठी अनेक ठिकाणी देव पाण्यात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (प्रतिनिधी)
तरच खरीप हाती...
पुनर्वसू व पुष्य या दोन नक्षत्रात पाऊस झाला तरच खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती लागणार अन्यथा एकरी साडेचार हजार रूपये आलेला खर्च मातीत जाणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईचे संकट
जुलै उजाडला तरी मान्सूनच्या पावसाने डोळे वटारले आहेत. त्यामुळे काही दिवसात पाण्याचा ठणठणाट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे खरीप हंगाम वाया जातोय की काय अशी भीती बळीराजाला वाटू लागली आहे.
खटाव तालुक्याच्या पूर्व भागात पेरण्या रखडल्या
रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रे वाया : शेतकऱ्यांचे लक्ष आता पुनर्वसू नक्षत्राकडे
कातरखटाव : खटाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे ७० टक्के खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाने दडी मारल्याने ३० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी महत्त्वाची असणारी रोहिणी, मृग व आर्द्रा ही तिन्ही नक्षत्रे वाया गेली आहेत. त्यामुळे आता पुनर्वसू नक्षत्रातील तरणा पाऊस तरी शेतकऱ्यांना तारणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मध्यंतरी झालेल्या जेमतेम पावसाच्या ओलीवर या भागातील श्ोतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणी उरकली असली तरी उशिराची पिकेधोक्यात आली आहेत. पावसाने अशीच दडी मारली तर पिके जगवायची कशी, याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे. खटाव तालुक्यासह या भागातील शेतकऱ्यांचे डोळे आता सोमवारपासून सुरू झालेल्या पुनर्वसूतल्या तरण्या पावसाकडे लागले आहेत.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत असते. शिवारात उभे असलेले उसाचे पीक पाणी नसल्याने खुंटले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. या भागात यंदा उन्हाळी, पाऊस म्हणावा तसा न झाल्यामुळे मान्सूनच्या भरवशावरच अनेक शेतकऱ्यांनी मशागत कशीबशी उरकून घेतली. मात्र मान्सून बरसलाच नसल्यामुळे ३० टक्के पेरण्या रखडल्या आहेत.
या भागातील शेतकरी गतवर्षी तुफान गारपीट व अवकाळीने पुरता हैराण झाला आहे. ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे मान्सून यावर्षी बरसणार की जेमतेम हजेरी लावून जाणार, या विचाराने शेतकरी हैराण झाले असून प्रत्येकजण पावसाची वाट पहात आहे. रोहिणी नक्षत्रानंतर जून महिन्यातील मृग नक्षत्राने शेतकऱ्यांना मृगजळच दाखवल्यासारखे झाले आहे, हे नक्षत्र जवळजवळ कोरडेच गेले असून मान्सूनने हजेरी न लावल्याने जनावरे जगवायची कशी, कर्जे फेडायची कशी असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यासमोर आ वासून उभे राहिले आहेत. (वार्ताहर)