आज गौराईचे आगमन, महिलांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:00+5:302021-09-12T04:28:00+5:30
कोल्हापूर : गणपती बाप्पांपाठोपाठ आज रविवारी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. यानिमित्त शनिवारी गौराईचे डहाळे, मुखवटे, साड्या या पूजेच्या ...

आज गौराईचे आगमन, महिलांची लगबग
कोल्हापूर : गणपती बाप्पांपाठोपाठ आज रविवारी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. यानिमित्त शनिवारी गौराईचे डहाळे, मुखवटे, साड्या या पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे देवीच्या आगमनाच्या तयारीसाठी महिलांची लगबग सुरू होती.
गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दोन दिवसांनी घरोघरी गौराईची प्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येक कुटुंबात गौरी प्रतिष्ठापनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही कुटुंबांत फक्त पानांच्या, काही कुटुंबात तांब्यावरच्या, गौराईचे डहाळे, मुखवटे किंवा उभ्या मूर्ती पुजल्या जातात. कुठे शंकरोबाची मूर्तीही प्रतिष्ठापित केली जाते. कुठे फक्त गंगा गौरी असतात. यानिमित्त कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली व गंगावेश कुंभार गल्लीत गौरीचे मुखवटे घेण्यासाठी आलेल्या महिलांची गर्दी होती. मुखवट्यांची किंमत दीडशे रुपयांपासून पुढे आहे, तर पूर्ण उभ्या मूर्ती दीड हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.
गौरी आवाहनाच्या दिवशी देवीला मिश्र पालेभाज्या, भाकरी, आंबील, असा नैवेद्य दाखवला जातो. यानिमित्त पालेभाज्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गौरी आवाहन झाल्यावर सायंकाळी उभ्या मूर्तीची मांडणी केली जाते. गौराईला नेसवण्यासाठी काठाच्या साड्या, कानातले, गळ्यातले दागिने, हार, बांगड्या, कर्णफुले, बाजूबंद, अशा वेगवेगळ्या अलंकारांची खरेदी केली जात होती. यानिमित्त शहरातील पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, राजारामपुरी या बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती.
----
दीड दिवसाच्या मूर्तीचे विसर्जन
दरम्यान, शनिवारी दुपारी दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. गणपती बाप्पांना घरी येऊन एक रात्र गेली नाही तोपर्यंत नागरिकांना जड अंत:करणाने देवाला निरोप द्यावा लागला. एरवी यादिवशी सहाशे ते आठशे मूर्तींचे विसर्जन होते. यंदा प्रशासनाने नागरिकांना आपल्या भागातच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन केल्याने पंचगंगा नदी घाट व रंकाळ्यावर विसर्जनासाठी फारशी गर्दी नव्हती.
---
फोटो नं ११०९२०२१-कोल-गौरी०१,०२
ओळ : गणपती बाप्पांपाठोपाठ आज रविवारी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. यानिमित्त कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर येथे महिलांनी गौरीचे डहाळे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---
फोटो नं ११०९२०२१-कोल गणपती विसर्जन०१,०२
ओळ : कोल्हापुरातील रंकाळा तलाव येथे शनिवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---