शिरढोण खूनप्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:59+5:302021-02-05T07:07:59+5:30
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील आरोपीचा तत्काळ शोध घेऊन अटक करावे. पंधरा दिवसात आरोपी न ...

शिरढोण खूनप्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करा
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील आरोपीचा तत्काळ शोध घेऊन अटक करावे. पंधरा दिवसात आरोपी न सापडल्यास शेतमजुरांना घेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विविध शेतमजूर संघटना व स्वाभिमानी संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
शेतमजूर महिला या आर्थिक संकटात असतात. गरिबीमुळे त्यांना काहीवेळेला लाचारीचे जीवन जगावे लागते. त्याचाच काही लोक गैरफायदा घेत असतात. शिरढोणमधील शेतमजूर महिला शोभा खोत हिचा अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केला आहे. या घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप आरोपी सापडला नाही. शेतमजूर महिलांना मजुरीसाठी गावापासून लांब पल्ल्याच्या शेतात जावे लागत असते. अशा घटनांमुळे व आरोपीच अद्याप न सापडल्याने महिलावर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
शिष्टमंडळात राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने, लाल बावटा युनियनचे भाऊसाहेब कसबे, ‘स्वाभिमानी’चे विश्वास बालिघाटे, हैदरअली मुजावर आदी सहभागी झाले होते.