लॉकडाऊनपूर्वी शेतमालाच्या वितरणाची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST2021-03-31T04:23:57+5:302021-03-31T04:23:57+5:30
जयसिंगपूर : लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी व शेतमालाचे दर पडणार नाहीत याची खात्री ...

लॉकडाऊनपूर्वी शेतमालाच्या वितरणाची व्यवस्था करा
जयसिंगपूर : लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी व शेतमालाचे दर पडणार नाहीत याची खात्री द्यावी, अशी मागणी मुंबई मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली.
सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे संकेत राज्य सरकारकडून वारंवार दिले जात आहेत. गतवर्षी राज्य आणि केंद्र सरकारने कोणताही विचार न करता तसेच पूर्वतयारी न करता त्वरित लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस, फळ उत्पादक, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. जिल्हा तसेच गावबंदी झाल्याने खरेदीदार मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतीमाल शेतातच टाकून द्यावा लागला. तसेच दरही मोठ्या प्रमाणात कोसळले. याची कोणतीही नुकसानभरपाई सरकारकडून देण्यात आली नाही. तसेच विमा कंपन्यांनी देखील हात वर केले.
आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लॉकडाऊन होणार या बातम्यांमुळे शेतीमालाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अचानक लॉकडाऊन झाले तर वाहतूक व्यवस्था ठप्प होईल, या भीतीने खरेदीदार शेतीमाल उचलेना झालेत. राज्य सरकारदेखील लॉकडाऊनची तयारी करत आहे. या संदर्भात राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेसंदर्भात सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून कोणत्याही जिल्ह्यात शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. लॉकडाऊनबाबत भूमिका घेताना शेतीमालाच्या वितरण व्यवस्थेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच शेतमालाचे दर पडणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी. अन्यथा पुन्हा राज्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
फोटो - ३००३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - मुंबई मंत्रालय येथे राजू शेट्टी यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन दिले.