दोेन कुटूंबियाच्या वादात मध्यस्थाचाच निघृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:20+5:302021-01-08T05:23:20+5:30
कोल्हापूर : दोन कुटुंबांच्या वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वर्मी घाव घालून निघृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी ...

दोेन कुटूंबियाच्या वादात मध्यस्थाचाच निघृण खून
कोल्हापूर : दोन कुटुंबांच्या वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वर्मी घाव घालून निघृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा फुुलेवाडी रिंगरोडवर नाना पाटील नगरशेजारील वासुदेव कॉलनीत बॉलच्या कारखान्यानजीक घडली. आकाश आनंदराव वांजोळे (वय २८ रा. वासुदेव कॉलनी, नाना पाटील नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार दत्तात्रय तम्मा फोंडे (३० रा. वासुदेव कॉलनी) हा जखमी झाला आहे. जेवणातील खरकटे पदार्थ घरासमोरील गटारात टाकण्यावरुन काही महिने कचरे व फोंडे कुटुंबात वाद होता, त्याचे पर्यावसान मध्यस्थाच्या खुनात झाले. या घटनेमुळे संपूर्ण नाना पाटील नगरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी भारत दिलीप कचरे (वय ३२) त्याचा भाऊ मारुती कचरे (३४), सुरेश कचरे (२९, सर्व रा. वासुदेवनगर) हे किरकोळ जखमी झाल्याने तेही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना करवीर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.
वासुदेव कॉलनीतील बॉल कारखान्यानजीक कचरे व फोंडे ही कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहतात. घरासमोरील गटारात खरकटे ओतण्यावरुन त्यांच्यात वाद होता. अनेकदा हा वाद पोलिसांपर्यंतही पोहोचला होता. बुधवारी रात्री कचरे व फोंडे कुटुंबियांत वाद उफाळला. दत्ता फोंडे याने फोनवरुनच आकाशला बोलावले. आकाश हा स्वामी आणि मुळीक या मित्रांसह घटनास्थळी आला. त्यावेळी कचरे यांचे तिन्ही भाऊ व महिलाही हातात काठ्या, हत्यार घेऊन उभे होते. आकाशने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वादातच कचरे कुटुंबियांनी दत्ता फोडे याच्यावर हल्ला केला. दत्ताला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी कचरे बंधूंनी रागातच आकाशवरही हल्ला केला. कोयत्याचा वर्मी घाव मानेवर बसल्याने आकाश रक्तबंबाळ झाला, तो पुढे पंधरा फुटांवर जाऊन अतिरक्तस्त्रामुळे जमिनीवर कोसळला. सुभाष फोंडे यांनी त्याला व दत्ताला टेम्पोतून सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच आकाशचा मृत्यू झाला, तर दत्ता फोंडेवर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच आकाशच्या समर्थकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. पोलिसांनी रात्री घटनास्थळी बंदोबस्त ठेवला. गुरुवारी सकाळी शांततेत आकाश वांजोळेवर अत्यंस्कार करण्यात आले.
दरम्यान, संशयित आरोपी तिन्ही कचरे बंधूंना औषधोपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तिघांनाही करवीर पोलिसांनी अटक केली आहे. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी तातडीने भेट देऊन माहिती घेतली.
वांजोळे कुटुंबीय मूळचे खडकलाट (ता. चिक्कोडी, कर्नाटक) येथील असून, नोकरीनिमीत्त कोल्हापुरात आले. आनंदराव वांजोळे हे ‘बीएसएनएल’मधून प्रथम वर्ग अधिकारी पदावरुन नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पत्नी, अविवाहित मुलगी व आकाश हा मुलगा होता. आकाश हा रस्ता कामांवर सुपरवायझर म्हणून काम पाहात होता.
मध्यस्ती केली अन् अंगाशी आली
दोन कुटुंबातील वाद मिटवताना आकाशने वारंवार फोंडे कुटुंबियांचीच बाजू घेतली, त्याच रागातून कचरे कुटुंबियांनी आकाशला लक्ष्य बनविल्याची चर्चा परिसरात सुरु होती.
फोटो नं. ०६०१२०२१-कोल-आकाश वांजोळे (नाना पाटील नगर खून)
फोटो नं. ०६०१२०२१-कोल-नाना पाटील नगर खून०१
ओळ : खून झालेल्या आकाश वांजोळे याच्या निवासस्थानी मित्र, नातेवाईकांची गर्दी
फोटो नं. ०६०१२०२१-कोल-नाना पाटील नगर खून०२
ओळ : घटनास्थळी फोंडे व कचरे यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.