Kolhapur: संकेश्वरनजीक धावती आरामबस पेटली; सुदैवाने प्रवाशी, चालक-वाहक सुखरूप बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 02:08 PM2024-03-02T14:08:53+5:302024-03-02T14:10:04+5:30

प्रवाशांनी अक्षरशः हात जोडले..!

Arambus running near Sankeshwar caught fire; Fortunately, the passenger, driver-carrier escaped unharmed | Kolhapur: संकेश्वरनजीक धावती आरामबस पेटली; सुदैवाने प्रवाशी, चालक-वाहक सुखरूप बचावले

Kolhapur: संकेश्वरनजीक धावती आरामबस पेटली; सुदैवाने प्रवाशी, चालक-वाहक सुखरूप बचावले

राम मगदूम 

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : संकेश्वरनजीक भरधाव खासगी आराम बसचे ब्रेक लाइनिंग जाम होऊन घर्षणामुळे लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून बसमधील २८ प्रवाशासह चालक -वाहक सुखरूप बचावले. या दुर्घटनेत  प्रवाशांच्या साहित्यासह बसचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर  संकेश्वरनजीक सोलापूर फाटयावर ही घटना घडली.   

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शर्मा ट्रॅव्हल्सची आराम बस (क्रमांक पी.वाय.०१/डी. ए.७६७६) मुंबईहून बंगळुरूला जात होती. बसमध्ये एकूण २८ प्रवाशी  होते. शुक्रवारी पहाटे सोलापूर व हरगापूर गावच्या फाट्याजवळ पाठीमागील चाकाचे ब्रेक लाइनिंग जाम होवून घर्षणामुळे बसला आग लागली. बसला आग लागल्याचे बसचालक सिद्धाप्पा यांच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखून त्यांनी वेग कमी करत बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरवले,त्यामुळे कोणताही जिवितहानी झाली नाही.

दरम्यान, पाठीमागील आग पसरत जाऊन इंजिन, गॅस टॅंक आणि वातानुकूलित यंत्रणेपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण बस पेटली. ही बातमी समजताच महामार्ग रुंदीकरण कामाचे ठेकेदार  कंपनीचे भरारी पथक, संकेश्वर नगरपालिकेचे अग्निशामन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने मोठ्या शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

तथापि, गाडीतील फायबर सीट आणि कुशनमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळून खाक  झाली.त्यामुळे घटनास्थळी आराम बसचा केवळ लोखंडी सांगाडाच  शिल्लक राहिला. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रवाशांनी अक्षरशः हात जोडले..!

आराम बसमधील सर्व प्रवासी धारवाड, हुबळी व बंगळुरू परिसरातील होते. पहाटेच्या साखर झोपेत असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते सैरभैर झाले होते. जिवाच्या आकांताने सगळे बसमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. डोळयादेखत जळणारी बस पाहताना त्यांच्या अंगावर शहारे येत होते. बसमधून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी अक्षरशः हात जोडून देवाचे आणि चालकाचे आभार मानले.

Web Title: Arambus running near Sankeshwar caught fire; Fortunately, the passenger, driver-carrier escaped unharmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.