शिव-शाहूंच्या वंशजांची नियुक्ती हे देशाचे भाग्य
By Admin | Updated: June 14, 2016 00:52 IST2016-06-14T00:52:08+5:302016-06-14T00:52:19+5:30
नरेंद्र मोदी : संभाजीराजे यांचा अलाहाबाद येथील भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सत्कार

शिव-शाहूंच्या वंशजांची नियुक्ती हे देशाचे भाग्य
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिव-शाहू यांच्या वंशज असलेल्या संभाजीराजे यांची नियुक्ती ही आमच्यासह संपूर्ण देशासाठी भाग्याची बाब आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले.
अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी उपपंतप्रधान व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह १६ राज्यांचे मुख्यमंत्री यांची होती. या सत्कार सोहळ्यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी जागेवर उभे राहून टाळ्यांच्या गजरात संभाजीराजेंचे अभिनंदन केले.
राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर थेट निवड झाल्यानंतर सोमवारी सकाळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील खास विमानाने संभाजीराजेंना घेऊन अलाहाबाद येथे गेले. येथे संभाजीराजे यांचा अभूतपूर्व सत्कार करण्यात आला.
नरेंद्र मोदी म्हणाले, शिव-शाहू यांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांची नियुक्ती ही आमच्यासह संपूर्ण देशासाठी भाग्याची बाब आहे.
दरम्यान, सत्कारापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित देशभरातील मान्यवरांना छत्रपती शिवराय व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या देदीप्यमान इतिहासाची माहिती दिली. बहुजन समाजाचा उद्धार करणाऱ्या शाहू महाराजांनी १९०२ साली दिलेले आरक्षण, सक्तीच्या शिक्षणाचा केलेला कायदा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी केलेली आर्थिक तरतूद यांची माहिती दिली. (प्रतिनिधी)
सर्वांनी उभे राहून सन्मान करुया : शहा
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मान म्हणजे छत्रपती घराण्याचा सन्मान आहे. त्यांना राज्यसभेवर सदस्यपद देऊन संभाजीराजेंचा सन्मान करू शकलो हे आमचे भाग्य आहे. त्यामुळे सत्कारावेळी सर्वांनी उभे राहून त्यांचा सन्मान करूया, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.