राजकारणात काहीही घडू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:56 IST2018-04-08T23:56:09+5:302018-04-08T23:56:09+5:30

राजकारणात काहीही घडू शकते
मुरगूड : कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच नेत्यांनी गटातटाच्या पुढे जावे, असे सांगून तसेच संजयबाबा घाटगे यांनी बॉलिंग करावी आणि आपण फक्त बॅटिंग करावी किंवा आपण बॉलिंग करावी आणि बाबांनी बॅटिंग करावी हे मान्य नसून कागलच्या राजकारणात आम्ही दोघांनीही कायमच बॅटिंग करावी, अशी माझी इच्छा असून भविष्याच्या राजकारणात काय होणार हे आपल्याला माहीत नाही असे सांगतानाच राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
निमित्त होते नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामान्यांच्या उद्घाटन. यावेळी संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक झाली. खेळाडूंची ओळख झाल्यानंतर संयोजकांच्या वतीने निवेदकांनी संजय मंडलिक यांनी बॅटिंग करावी व संजयबाबा यांनी बॉलिंग करावी, असे आवाहन केले. पण दोघाही नेत्यांनी बॅटिंग करून चांगलीच फटकेबाजी केली.
यावेळी संजय मंडलिक पुढे म्हणाले, कागल तालुक्याच्या पर्यायाने मुरगूडच्या क्रीडा विकासासाठी आपण भरीव प्रयत्न करणार असून, मुरगूड शहरामध्ये होणाऱ्या सर्वच स्पर्धा वेगळ्या आणि भव्यदिव्य होतात. सध्याचे मैदान यासाठी अपुरे ठरत आहे. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांनी सामूहिक प्रयत्न करून भव्य मैदान तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत यासाठी आपले सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या मैदानाला अडथळा येईल, असे कोणतेही काम पालिका करणार नाही, असे अभिवचन त्यांनी दिले.
स्वागत सम्राट मसवेकर यांनी केले. प्रास्ताविकातून जिल्ह्याच्या विकासासाठी संजय मंडलिकच खासदार झाले पाहिजे, असे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सहायक पोलीस निरीक्षक राकेश हांडे, दलितमित्र डी. डी. चौगले, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, सुहास खराडे, दगडू शेणवी, शिवाजी इंदलकर, दत्ता मंडलिक, बी. एम. पाटील, नंदू पाटील, शेखर सावंत, जयसिंगराव भोसले, संदीप कलकुटकी, म्हाळू बोते उपस्थित होते. आभार समाधान्
राजेखान, दोन खडे जवळ ठेवा
प्रा. मंडलिक यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मनोहर जोशी यांचे उदाहरण देत जर यशस्वी व्हायचे असेल, तर जमादार तुम्ही दोन खडे जवळ ठेवा. त्यातील बर्फाचा खडा डोक्यावर ठेवा आणि दुसरा साखरेचा खडा तोंडात ठेवा, असे सुचवले. तसे झाल्यास तुमच्याजवळ आहे त्यापेक्षा लोक अधिक येतील.