उत्कंठा.... घालमेल... हुरहुरीत गेला कोल्हापूरकरांचा गुरुवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:05+5:302020-12-05T04:56:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मतमोजणीला ...

उत्कंठा.... घालमेल... हुरहुरीत गेला कोल्हापूरकरांचा गुरुवार
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून कोल्हापूरकरांच्या नजरा पुण्याकडे होत्या. सगळ्यांच्या नजरा ‘शिक्षक’ मतदारसंघाकडे होत्या. ‘जयंत आसगावकर’ यांचे काय झाले, अशी विचारणा दिवसभर सुरू होती. ‘उत्कंठा... घालमेल... हुरहुरीतच कोल्हापूरकरांचा गुरुवार गेला.
कधी नव्हे इतकी चुरस पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात यावेळेला पाहावयास मिळाली. त्यात ‘शिक्षक’ मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर हे स्थानिकचे उमेदवार असल्याने उत्सुकता होती. विधानसभा, लोकसभेप्रमाणे प्रचार यंत्रणा राबविल्याने निकालाबाबत कमालीची उत्कंठा होती. गुरुवारी सकाळी आठपासूनच कोल्हापूरकरांच्या नजरा पुण्याकडे लागल्या होत्या. दुपारी तीननंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर व अरुण लाड हे आघाडीवर राहिले. रात्री साडेसातपर्यंत पहिल्या पसंतीची मतमोजणी झाल्यानंतर आसगावकर यांची तोकडी आघाडी राहिल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, पहिल्या पसंती फेरीनंतर मताधिक्य वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले.
सोशल मीडियावरील अफवेने संभ्रम
इतर निवडणुकीपेक्षा या निवडणुकीचे मतदान देण्याची प्रक्रिया वेगळी आहे. पसंती क्रमांक व जास्त उमेदवार असल्याने मतपत्रिकेचे वर्गीकरण करण्यातच गुरुवारची दुपार गेली. मात्र, सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जात होत्या, त्यामुळे नागरिकांत संभ्रम होता.
कोल्हापुरातून हजारो कार्यकर्ते पुण्याला
मतमोजणी प्रतिनिधी बुधवारी दुपारीच पुण्याला रवाना झाले होते. मात्र, आसगावकर व काँग्रेस समर्थक हजारो कार्यकर्ते गुरुवारी सकाळपासून पुण्यात तळ ठोकून होते.
- राजाराम लोंढे