लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने ॲंटिजन चाचणी करण्यात आली. हमाल, तोलाईदार, ग्राहक व पोलीस अशा ९७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोन पोलीस व एक हमाल कोरोनाबाधित आढळले. चाचण्यांची मोेहीम सुरूच राहणार असल्याचे समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
कोल्हापुरात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने चाचण्यांवर भर दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊन आरोग्य यंत्रणा अँटिजन चाचण्या करत आहे. बाजार समितीमध्ये सकाळी सौद्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातून संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने गर्दी नियंत्रणासाठी समिती प्रशासनाने दक्षता घेतली आहे. मात्र भाजीपाला, फळांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने मंगळवारी समिती आवारात येणारे ग्राहक, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार या सर्व घटकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी व एक हमाल कोरोनाबाधित आढळला आहे. समितीमध्ये सौद्यावेळी होणारी गर्दी व कोरोनाचा वाढता संसर्ग या पार्श्वभूमीवर अँटिजन चाचण्या सुरूच राहणार असल्याचे समिती प्रशासनाने सांगितले.