अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 'महास्वयम' चालेना, मंजुरी पत्र, व्याज परतावाही मिळेना; पोर्टल १५ दिवस बंद 

By पोपट केशव पवार | Updated: April 30, 2025 14:00 IST2025-04-30T13:59:37+5:302025-04-30T14:00:47+5:30

पोपट पवार कोल्हापूर : राज्यात लाखांहून अधिक तरुणांना उद्योजक बनवणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे महास्वयम हे पोर्टल अपडेट ...

Annasaheb Patil Corporation Mahaswayam not working, approval letter interest refund not received; Portal closed for 15 days | अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 'महास्वयम' चालेना, मंजुरी पत्र, व्याज परतावाही मिळेना; पोर्टल १५ दिवस बंद 

संग्रहित छाया

पोपट पवार

कोल्हापूर : राज्यात लाखांहून अधिक तरुणांना उद्योजक बनवणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे महास्वयम हे पोर्टल अपडेट केले नसल्याने गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. परिणामी, महामंडळाचे प्राथमिक मंजुरी पत्र (एलओआय) मिळणे अवघड झाले आहे.

विशेष म्हणजे या पोर्टलवर बँकांचे हप्ते भरलेले क्लेमही अपलोड होत नसल्याने लाभार्थी चांगले वैतागले आहेत. आधीच व्याज परतावा नऊ नऊ महिने मिळालेला नाही, त्यात आता हप्ते भरूनही व्याज परताव्यासाठी वाट पाहावी लागत असल्याने या योजनेचा लाभच नको म्हणण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून ५० हजार रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रकरणांवर व्याज परतावा देण्यात येतो. विविध उद्याेग, व्यवसाय उभारणाऱ्या तरुणांना हा परतावा मिळत असल्याने राज्यभरात एक लाखांहून अधिक तरुणांनी स्वावलंबनाची वाट धरली आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेतले की त्यावर १२ टक्क्यांपर्यंतचा परतावा महामंडळाकडून दिला जातो.

त्यासाठी सुरुवातीला बँकेतून कर्ज मंजूर झाले की याची सर्व कागदपत्रे एलओआयसाठी महामंडळाकडे द्यावी लागतात. त्यांचे प्राथमिक मंजुरी पत्र मिळाले की बँकेतून कर्ज व महामंडळाचा व्याज परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो; मात्र सध्या महामंडळाच्या या पोर्टलमध्ये अडथळे येत असल्याने नव्या लाभार्थ्यांना हे पत्र मिळत नाही. परिणामी, महामंडळाचा लाभ घेण्यास मर्यादा येत आहेत.

म्हणे पोर्टल अपडेट नसल्याने समस्या

महामंडळाने सुरुवातीला एका एजन्सीकडून हे पोर्टल तयार करून घेतले होते; मात्र त्यांनी ते वेळोवेळी अपडेट केले नसल्याने सध्या हँग होऊन पोर्टल बंद पडले आहे. त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक डेटा असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

क्लेमही अपलोड होईना

बँकांचे हप्ते महिन्याला भरले की त्याचे बँक स्टेटमेंट जोडून व्याज परतावा मिळण्यासाठीचा क्लेम महास्वयमवर अपलोड करावा लागतो. महामंडळाकडून याची तपासणी होऊन त्यानंतर संबंधित लाभार्थ्याला व्याज परतावा दिला जातो; मात्र सध्या या पोर्टलवर हा क्लेम अपलोडच होत नाही. त्यामुळे हप्ते भरूनही संबंधित लाभार्थ्याला परताव्यासाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे.

पोर्टल अपडेट केले नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे; मात्र आम्ही यावर मार्ग काढत आहोत. -नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ.

Web Title: Annasaheb Patil Corporation Mahaswayam not working, approval letter interest refund not received; Portal closed for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.