कोल्हापूर : वीरशैव समाजाची महत्त्वाची आर्थिक संस्था असलेल्या येथील वीरशैव को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी अनिल बाबूराव सोलापुरे (रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर), तर उपाध्यक्षपदी रंजना कृष्णात तवटे (रा. कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या निवडी झाल्या.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्याअगोदरही तीन महिने सोलापुरे हेच अध्यक्ष होते. परंतु त्यांना कमी कालावधी मिळाल्याने मावळत्या अध्यक्ष-उपाध्यक्षांना पुन्हा एक वर्षाची संधी देण्यात आली. सोलापुरे यांचे नाव ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे यांनी सुचवले. त्यास बाबासाहेब देसाई यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी तवटे यांचे नाव राजेश चंदूरकर यांनी सुचविले. त्यास गणपतराव पाटील यांनी अनुमोदन दिले. नूतन पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत बँकेची वाटचाल गौरवाशाली होईल असा विश्र्वास निवडीनंतर संचालकांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सरव्यवस्थापक अविनाश खोत यांच्यासह सर्व मान्यवर संचालक यावेळी उपस्थित होते. संचालक राजेंद्र लकडे यांनी आभार मानले.
दोन हजार कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. बँकेस शेड्युल्ड दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. कर्नाटकातील मुधोळ बँकेेचे वीरशैवमध्ये विलीनीकरण करणार आहोत. ‘बँक आपल्या दारी’ नेण्याचा संकल्प केला आहे.
अनिल सोलापुरे
अध्यक्ष
वीरशैव को-ऑप बँक कोल्हापूर.
फोटो : २८०१२०२१-कोल-वीरशैव बँक फोटो