अँजिओग्राफी होणार तीन हजारांत !
By Admin | Updated: December 20, 2015 01:45 IST2015-12-20T01:02:56+5:302015-12-20T01:45:42+5:30
रामानंद यांची माहिती : ‘सीपीआर’मधील सुधारणांवर शासकीय समिती समाधानी; वारंवार तपासणी करणार

अँजिओग्राफी होणार तीन हजारांत !
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची (सीपीआर) शनिवारी सकाळी शासकीय अभ्यागत समितीने पाहणी करून गेल्या तीन महिन्यांतील झालेल्या सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले. समितीने प्रामुख्याने हृदय शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करून गेल्या तीन महिन्यांत रुग्णांवर केलेल्या उपचारांची व उपकरणांची माहिती घेतली.
हृदय शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाल्याची तसेच अॅँजिओग्राफीचे दर कमी करण्यासंदर्भात महिन्याभरात मंजुरी मिळेल, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता र्
डॉ. जयप्रसाद रामानंद यांनी अभ्यागत समितीला दिली. रुग्णालयातील हजेरीपत्रकाप्रमाणे कामगार हजर असावेत यासाठी अभ्यागत समिती तपासणी करणार असल्याचा इशारा यावेळी महेश जाधव यांनी दिला.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) बचाव कृती समितीने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या समितीने शनिवारी सकाळी सुमारे दोन तास सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. समितीने विशेषत: हृदय शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करताना सुरू असणाऱ्या उपकरणांचीही तसेच तीन महिन्यांत रुग्णांवर केलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, डॉ. अजित लोकरे, डॉ. सुरेखा बसर्गे, सुनील करंबे, अजित गायकवाड यांच्या समितीने भेट दिली.
समितीला माहिती देताना डॉ. रामानंद म्हणाले, काही महिन्यांची तुलना करता गेल्या तीन महिन्यांत रुग्णालयात सुधारणा होत आहे. हृदय शस्त्रक्रिया विभागात डॉ. प्रवीण साळुंखे, डॉ. मयूर मस्तुद व डॉ. स्मृती हिंडारिया, तर हृदय चिकित्सा विभागात डॉ. उदय मिरजे व डॉ. रवी पवार हे पूर्णवेळ पाच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तसेच सद्य:स्थितीत या विभागात पूर्णवेळ ‘ओपीडी’ सुरू करण्यात आले आहे. त्याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद आहे. दररोज सरासरी १५ ते २० इको होत आहेत, तर ५० ते ६० रुग्णांची दररोज तपासणी होत आहे. रुग्णांसाठी लागणारी रक्त लघवी व एक्स-रे तसेच इतर तपासण्यासाठी सी.व्ही.टी.सी. विभागात स्वतंत्ररीत्या प्रयोगशाळा अद्ययावत केलेली आहे. यापूर्वीची रुग्णांची गैरसोय विचारात घेता इको, अँजिओग्राफी व अँजिओप्लॉस्टीसारख्या तपासणी दररोज केल्या जात आहेत.
महेश जाधव म्हणाले, ‘सीपीआर’संदर्भात अनेक गैरसमज पसरले आहेत. मधल्या काही कालावधीसाठी ‘सीपीआर’मध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने काही प्रमाणात रुग्णांची कुचंबणा झाली असावी; पण सध्याच्या परिस्थितीत सुमारे पाच वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध असल्याने आता रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. गेल्या तीन महिन्यांत ‘सीपीआर’मध्ये रुग्णांवर झालेल्या उपचारांचा प्रगती अहवाल पाहून समितीने समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे ‘सीपीआर’च्या प्रगतीसाठी समिती सोबत असेल, अशी ग्वाही त्यांनी डॉ. रामानंद यांना दिली. यावेळी समितीला ‘सीपीआर’मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण साळुंखे, डॉ. उदय मिरजे, आदींनी माहिती दिली.