ऐच्छिक निधीबाबत नाराजी

By Admin | Updated: March 17, 2016 00:53 IST2016-03-17T00:53:49+5:302016-03-17T00:53:49+5:30

महापालिका : नगरसेवकांना हवा सहा लाख रुपयांचा निधी

Anger against the voluntary fund | ऐच्छिक निधीबाबत नाराजी

ऐच्छिक निधीबाबत नाराजी

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने नवीन अंदाजपत्रकातील तरतुदीद्वारे देऊ केलेल्या अडीच लाखांच्या ऐच्छिक निधीबाबत नगरसेवक कमालीचे नाराज असून पुढील आर्थिक वर्षात सर्व नगरसेवकांना प्रत्येकी सहा लाखांचा निधी तसेच उपनगरांतील नगरसेवकांना दोन लाखांचा अतिरिक्त निधी देण्याची सूचना केली आहे तसेच प्रशासनाला विसर पडलेल्या ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी नव्याने पाच लाखांची तरतूद करण्यात आग्रह नगरसेवकांनी धरला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त पी. शिवशंकर यांनी नुकतेच स्थायी समिती सभेत सादर केले. आता स्थायी समिती सदस्य त्यांना असलेल्या अधिकारात फेरबदल करून महासभेत सादर करणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून स्थायी समिती सदस्यांनी अंदाजपत्रकात फेरफार करत होते. आज, गुरुवारी पुन्हा बैठक घेऊन त्याला मूर्त स्वरुप दिले जाणार आहे.
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पुढील वर्षासाठी प्रत्येक नगरसेवकांना अडीच लाख रुपये ऐच्छिक निधी देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली होती; परंतु त्याबाबत नगरसेवकांत प्रचंड नाराजी आहे. त्याची दखल घेऊन स्थायी समितीने आता सरसकट सर्व नगरसेवकांना सहा लाखांचा ऐच्छिक निधी देण्याचा तर उपनगरांतील नगरसेवकांना अतिरिक्त दोन लाखांचा निधी द्यावा, असा आग्रह धरला आहे.
प्रशासनाने नवीन कोणत्याही योजना राबविण्याच्या नाहीत, असा निर्णय घेतला आहे. ज्या जुन्या प्रलंबित योजना आहेत त्याच पूर्ण करण्यावर आयुक्त पी. शिवशंकर यांचा आग्रह आहे. मर्यादित उत्पन्न, त्यात सरकारकडून निधी मिळण्याची अपेक्षा कमी आणि प्रभागातील नागरिकांच्या विकासकामांबाबत असलेल्या अपेक्षा या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर नगरसेवकांना नाराजीच ओढावून घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच स्थायी समितीसह सर्वच नगरसेवक ऐच्छिक निधी वाढवून घेण्याच्या विचारात आहे.

महानगरपालिकेचे या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीत सादर केले होते.
आता स्थायी समिती सदस्य आपल्या अधिकारात फेरबदल करून महासभेत सादर करणार
उपनगरांतील नगरसेवकांना दोन लाखांचा अतिरिक्त निधी देण्याची सूचना

Web Title: Anger against the voluntary fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.