अंगणवाडीसेविकांचे दोन महिने मानधन थकीत; दोन दिवसांत जमा होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:24+5:302021-03-06T04:22:24+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांचे गेल्या दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. कुटुंबांचा चरितार्थच या मानधनावर चालत असल्याने सेविका व मदतनीस ...

अंगणवाडीसेविकांचे दोन महिने मानधन थकीत; दोन दिवसांत जमा होण्याची शक्यता
कोल्हापूर : जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांचे गेल्या दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. कुटुंबांचा चरितार्थच या मानधनावर चालत असल्याने सेविका व मदतनीस आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दोन दिवसांत सेविकांच्या खात्यावर मनाधन जमा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर शहर व जिल्हा मिळून ३ हजार ९९४ अंगणवाड्या आहेत. तितक्याच संख्येने अंगणवाडीसेविका आणि मदतनीस काम करतात. या अंगणवाडीसेविकांना अंगणवाडीसोबतच शासनाकडून आलेली सर्व कामे पार पाडावी लागतात. भागातील सर्व्हेपासून ते नागरिकांच्या विविध प्रकारच्या नोंदी करणे, लसीकरण, बालकांच्या तब्येतीची चौकशी, शिवाय शासकीय कामे असतात. हे करताना केवळ मानच मिळतो धनाच्या बाबतीत सगळा आनंदी आनंदच असतो. गेल्या काही वर्षांत वारंवार शासनाकडे दाद मागितल्याने आता अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ झाली असली तरी काही वेळा ती वेळेत मिळत नाही. या सेविका व मदतनीस यांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही. त्यामुळे त्या आर्थिक अडचणीत आल्या आओत.
-----------
जिल्ह्यातील अंगणवाड्या : ३ हजार ९९४
मिनी अंगणवाड्या : २७९
अंगणवाडीसेविका : ३ हजार ९९४
अंगणवाडीसेविकेचे मानधन : ८ हजार ५००
मदतनीस यांचे मानधन : ४ हजार २००
----
अंगणवाडीसेविका त्यांच्या कामासह शासकीय कामेही जबाबदारीने पार पाडतात. त्यांचे कुटुंब मानधनावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांचे मानधन वेळेत जमा झाले पाहिजे. यंदा दोन महिने मानधन मिळालेले नाही. त्यामुळे दर महिन्याला मानधन मिळावे यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी.
-निवेदिता महाडिक (अंगणवाडीसेविका)
--
दोन दिवसांत जमा होणार
काही तांत्रिक कारणांमुळे अंगणवाडीसेविकांचे मानधन दोन महिने थकीत होते. मात्र, आता शासनाकडून मानधन काढण्याची कार्यवाही सुरू झाली असून दोनच दिवसांत सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा होईल.
-सोमनाथ रसाळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, जिल्हा परिषद)
---