कोल्हापूर : येलूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ७६ वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा मंगळवारी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याआधीही एका वृद्धेचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील रुग्णालयात झालेला कोरोनाचा हा दुसरा बळी आहे.या वृद्ध रुग्णाला २७ मे रोजी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याआधीही सांगली जिल्ह्यातील पलूस येथील कोरोनाग्रस्त वृद्धेचा रविवारी मृत्यू झाला होता.
आतापर्यंत जिल्ह्यात १६ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, यातील ११ जण हे महापालिका हद्दीतील आहेत. तीन ग्रामीण भागातील आहेत. दोन परजिल्ह्यातील आहेत. यातील सक्रिय रुग्ण सात असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण वाढले आहेत.सध्या सीपीआरमध्ये जरी एकही रुग्ण नसला तरी खासगी रुग्णालयात काहींवर, तर घरीच काहींवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात, तर कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू असून, लक्षणे असणाऱ्यांचे स्वॅब घेतले जात आहेत.
दृष्टिक्षेपात
- एकूण रुग्ण : १६
- महापालिका हद्दीतील : ११
- ग्रामीण भागातील : ०३
- परजिल्ह्यातील : ०२
- दोन दिवसांत वाढलेले रुग्ण : ०२