Mahadevi Elephant: महादेवीसाठी उच्चस्तरीय समितीकडे आज अर्ज दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:13 IST2025-09-18T13:12:05+5:302025-09-18T13:13:37+5:30
अर्जावर महास्वामी यांच्याकडून स्वाक्षऱ्या

Mahadevi Elephant: महादेवीसाठी उच्चस्तरीय समितीकडे आज अर्ज दाखल होणार
जयसिंगपूर : महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत पाठविण्या बाबतच्या अर्जावर कोल्हापूर येथे बुधवारी मठाचे महास्वामी यांनी स्वाक्षऱ्या पूर्ण केल्या. आज गुरुवारी उच्चस्तरीय समितीकडे नांदणी मठ, राज्य शासन व वनतारा यांच्या वतीने अर्ज दाखल होणार आहे. महादेवीला स्थलांतरित करावे अशी मागणी अर्जाद्वारे केली जाणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे अॅड. मनोज पाटील यांनी पत्रकारांना दिली.
हत्तीणीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत अनुमती द्यावी यासाठी विनंती अर्ज करण्यात आल्यानंतर उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर दिला होता. या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मंगळवारी प्राप्त झाला.
त्यानुसार नांदणी मठाकडून आपले म्हणणे तयार करण्यात आले आहे. यावर कोल्हापूर येथे महास्वामीजी यांच्या स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ही सर्व कागदपत्रे घेऊन टीम दिल्लीकडे रवाना झाली आहे. आज गुरुवारी नवी दिल्ली येथील उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. वनताराकडून अद्यावत हत्ती पुनर्वसन केंद्र नांदणी ते उभारण्यात येणार आहे त्यामुळे सर्वच बाजू सकारात्मक आहेत समितीच्या निर्णयाकडे आता महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक सीमाभागाचे लक्ष लागून राहिले आहे.