अमरीश घाटगेंची उमेदवारीच कळीचा मुद्दा!
By Admin | Updated: February 8, 2015 00:49 IST2015-02-08T00:39:41+5:302015-02-08T00:49:06+5:30
पी. एन., सदाशिवराव मंडलिक आग्रही : विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ यांचा विरोध

अमरीश घाटगेंची उमेदवारीच कळीचा मुद्दा!
राजाराम लोंढे / कोल्हापूर
‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या पॅनलमध्ये विद्यमान अठरापैकी दहा संचालकांची नावे निश्चित आहेत. तिघांच्या वारसदारांना संधी मिळणार असून, दोन जागांची अदलाबदल होऊ शकते. केवळ अमरीश घाटगे यांची उमेदवारीच सत्तारूढ गटाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरणार आहे. घाटगे यांच्या उमेदवारीला विक्रमसिंह घाटगे यांच्यासह हसन मुश्रीफ यांनी थेट विरोध केला आहे; तर पी. एन. पाटील, सदाशिवराव मंडलिक हे आग्रही राहणार असल्याने हा पेच सोडविणार कसा, यावरच पॅनलची रचना ठरणार आहे.
‘गोकुळ’ची उमेदवारी ही ठरावांच्या संख्येवरच ठरते. त्यामुळेच अरुण नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, दिलीप पाटील, रणजितसिंह पाटील, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, अनुराधा पाटील व पी. डी. धुंदरे या दहाजणांचे स्थान पक्के आहे.
आनंदराव पाटील-चुयेकर यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. तथापि त्यांना त्यांच्या तीन अपत्यांची अडचण आल्यास उमेदवारीची संधी जयश्री आनंदराव पाटील यांना मिळू शकते. राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद यांना संधी मिळणार आहे. निवास पाटील यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र उदय पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे.
अरुंधती घाटगे यांच्या ऐवजी अमरीश घाटगे यांना पॅनलमध्ये घेण्यासाठी संजय घाटगे यांचे प्रयत्न आहेत; पण घाटगे यांना उमेदवारीच द्यायची नाही, या अटीवर हसन मुश्रीफ व विक्रमसिंह घाटगे यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिल्याचे समजते. या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा आहे; पण घाटगे यांच्या उमेदवारीसाठी पी. एन. पाटील व सदाशिवराव मंडलिक हे आग्रही आहेत. पन्हाळा तालुक्यातून अरुण नरके यांचे समर्थक विश्वास जाधव हे भटक्या विमुक्त गटातून प्रतिनिधित्व करीत आहेत; पण पी. एन. पाटील यांनी थेट अरुण नरके यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पन्हाळ्यातील एक जागा ‘पी. एन.’ यांना देऊन हा वाद मिटू शकतो. दिनकर कांबळे, सुरेश पाटील यांच्या पॅनलमधील समावेशाबाबत साशंकता आहे.
विधानसभेच्या भीतीनेच ‘अमरीश’ना विरोध
कागलच्या राजकारणात संजय मंडलिक, नविद मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे व अमरीश घाटगे ही पिढी सक्रिय झालेली आहे. या चौघांमध्ये अमरीश घाटगे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले नेटवर्क तयार केले आहे. ‘गोकुळ’मध्ये संधी दिली तर ते अधिक सक्रिय होऊन विधानसभेला डोकेदुखी होऊ नयेत, यासाठी अमरीश यांना येथेच रोखण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली आहे.
चौगलेंची जागा चंदगडला!
३२३ ठराव असलेला चंदगड एकमार्गी करण्यासाठी येथे दीपक पाटील यांच्याबरोबर राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी देऊन सदाशिवराव मंडलिक यांची ताकद घेता येऊ शकते. यासाठीच बाबासाहेब चौगले यांच्या जागी राजेश पाटील यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
यांची उमेदवारी निश्चित
अरुण नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, दिलीप पाटील, धैर्यशील देसाई, अनुराधा पाटील, पी. डी. धुंदरे, रणजितसिंह पाटील, दीपक पाटील.
‘करवीर’मध्ये इच्छुकांची मांदियाळी
करवीरमधील ५८४ ठरावांपैकी शंभरहून अधिक ठराव विरोधात आहेत. करवीरला पाचऐवजी चार जागा द्याव्यात, अशी मागणी ज्येष्ठ संचालकांची आहे. यामध्ये चुयेकर, विश्वास पाटील, उदय पाटील हे निश्चित आहेत. उर्वरित एका जागेसाठी सुरेश पाटील यांच्यासह बाळासाहेब खाडे, चंद्रकांत बोंद्रे, पांडबा यादव, दशरथ माने, शहाजी पाटील, प्रकाश पाटील-कोगेकर, एस. के. पाटील, तुकाराम पाटील, हंबीरराव वळके, अशोकराव खोत इच्छुक असल्याने येथे ‘पी. एन’ यांना कसरत करावी लागणार आहे.