प्रवेशासाठीची रक्कम विद्यार्थ्याकडून लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:57+5:302021-02-05T07:09:57+5:30
कोल्हापूर : महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला दुचाकीवरून फिरवून त्याच्याकडील प्रवेशासाठी आणलेली सुमारे आठ हजाराची रक्कम लुटण्याचा प्रकार घडला. ...

प्रवेशासाठीची रक्कम विद्यार्थ्याकडून लुटली
कोल्हापूर : महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला दुचाकीवरून फिरवून त्याच्याकडील प्रवेशासाठी आणलेली सुमारे आठ हजाराची रक्कम लुटण्याचा प्रकार घडला. ही घटना दि. २५ जानेवारी रोजी दुपारी घडली. शिवप्रसाद सखाराम पोवार (वय २०, रा. बाळघोल, ता. कागल) असे लुटलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने मंगळवारी याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवप्रसाद पोवार हा दि. २५ जानेवारी रोजी गोपाल कृष्ण गोखले महाविद्यालयात बीएस्सी किंवा बी. कॉमच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी आठ हजार रुपये सोबत घेऊन आला होता. दुपारी तीन वाजता महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेची माहिती घेऊन तो सिग्नलनजीक उभारला होता. त्याचवेळी त्याच्याजवळ एका दुचाकीवरून दोघे अनोळखी युवक आले. त्यांनी त्याला कळंबा येथे सोडतो असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवले. त्यांनी त्याला हॉकी स्टेडियम, न्यू पॅलेस असे फिरवून टेंबलाई मंदिरमार्गे उजळाईवाडीकडे जाणाऱ्या निर्जन मार्गावर नेले. तेथे दुपारी रस्त्याकडेला दुचाकी थांबवून पाठीमागे बसलेल्या पोवार याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याने ते महाविद्यालयीन फी भरण्यासाठी पैसे आणल्याचे सांगून देण्यास नकार दिला. त्यावेळी चोरट्याने पोवार याच्या गळ्यातील सॅक हिसकावून घेतली, त्यातील फीसाठी ठेवलेले आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कोठे तक्रार दिल्यास सोडणार नसल्याची धमकी दिली. तसेच त्याला तेथेच सोडून ते चोरटे महामार्गाच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाले.
दरम्यान, फिर्यादी पोवार याने याबाबत मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा दोघा युवकांना ताब्यात घेतले आहे.