कोल्हापूर : येथील बुलेटचे प्रसिद्ध आणि बुलेटप्रेमींमध्ये डॉक्टर, अशी ओळख असलेले मिस्त्री अमोल रावसाहेब माळी (वय ४७ रा. मूळ बागल चौक, सध्या लिशा हॉटेल परिसर) यांचे रविवारी शिरोडा (जि. सिंधुदुर्ग येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जागीच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे.मुंबई, पुणे, सांगली, सातारा यांपासून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या अमोल माळी यांचा बुलेट रिपेअरीमध्ये मोठा हातखंडा होता. वडील रावसाहेब माळी यांच्यासोबत गॅरेज व्यवसायामध्ये लहानपणापासूनच त्यांना मदत करत अमोल यांनी या व्यवसायात प्राविण्य मिळवले होते. वडिलांच्या निधनानंतर अमोल यांनी बागल चौकातील अलंकार गॅरेज यशस्वीरीत्या सांभाळले. बुलेट वापरणाऱ्या मित्रांचा एक मोठा ग्रुप त्यांचा ‘टीम बुलेट रायडर’ या नावाने होता. ते प्रत्येक महिन्याला बुलेटवरून पर्यटनासाठी बाहेर जात होते. अमोल यांनी लडाखपर्यंतही बुलेटने प्रवास केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या जत्रा-यात्रा, जोतिबा यात्रा याकरिता ते भाविकांसाठी मोफत गाडी रिपेअरी करून सामाजिक बांधिलकी जपत होते. रविवारी सायंकाळी सर्वजण बीचवर फिरायला गेले असताना, अचानक तिथेच कोसळले व बेशुद्ध झाले. मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत सगळे संपले होते.
वेळीअवेळी जेवण, ताणतणाव यांमुळे तरुणांवर असे प्रसंग ओढावत आहेत. नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि योग्य आहार या गोष्टी निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. - डॉ. अर्जुन आडनाईक, हृदयरोग तज्ज्ञ.