अमिताभ वेड्यांनी पाहिला ‘शमिताभ’
By Admin | Updated: February 7, 2015 00:23 IST2015-02-07T00:23:13+5:302015-02-07T00:23:39+5:30
शहरातून रॅली : बच्चनवेडे कोल्हापुरी व्हॉटस् अॅप ग्रुप

अमिताभ वेड्यांनी पाहिला ‘शमिताभ’
कोल्हापूर : महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची छाप पडली नसलेला रसिक क्वचितच. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही आपल्या भूमिकांनी जगभरातील प्रेक्षकांच्या गळ््यातील ताईत बनलेल्या अमिताभ बच्चन यांच्या नावे तयार झालेल्या ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ या व्हॉटस अॅप ग्रुपमधील सदस्यांनी शुक्रवारी ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ बघत ‘शमिताभ’ चित्रपटाचा आस्वाद लुटला. पार्वती मल्टिप्लेक्स येथे प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ या लोगोचा टी शर्ट घालून ग्रुपमधील ६६ सदस्यांनी चित्रपट पाहिला. आजच ‘बच्चनप्रेमी कोल्हापुरी’ या ग्रुपमधील सदस्या स्मिता सावंत यांचा मुलगा ‘शमित’ याचा वाढदिवस असल्याने सर्वांनी मिळून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी या ग्रुपचा लोगो तयार केलेले अमरदीप पाटील, बच्चन यांचे छायाचित्र व पोस्टर्सनी आपली रिक्षा सजवलेले शशिकांत गजगेश्वर तसेच बेस्ट डीपी विजेते दीपक चोपडे, केतन नित्सुरे यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रॅली काढण्यात आली. महिन्याभरापूर्वी अॅडमिन सुधर्म वाझे यांनी सुरू केलेल्या एकूण ९८ सदस्य आहेत, बहुतेक अनोळखी पण ‘बच्चन’ या समान धाग्याने एकमेकांशी जोडले गेले. आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह पत्रकार, संपादक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, बिल्डर, जनरल मॅनेजर, व्यापारी यांचा त्यात समावेश आहे. दिवसभरात एक हजार पोस्ट पडणाऱ्या या ग्रुपमध्ये रोज रात्री मैफल भरते. एक सदस्य बच्चन यांचे गाणे जाहीर करतो व सगळेजण म्हणतातही. या ग्रुपवर आजपर्यंत ‘कौन बनेगा डीपी पती’, ‘टॅलेंट हंट बेस्ट सिंगस्’, ‘बेस्ट डायलॉग’, ‘बच्चन क्विझ कॉम्पिटिशन’ अशा स्पर्धा झाल्या आहेत. २५ हजारांहून अधिक पोस्ट पडल्या आहेत ज्या फक्त अमिताभ बच्चन यांचे चित्रपट, गाणी, डायलॉगवर आधारित आहेत. (प्रतिनिधी)