कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये आज शनिवारी व रविवारी केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे चित्रीकरणाला बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे हा आदेश काढला असून, त्यानुसार आज, शनिवारपासून रविवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ही बंदी लागू असेल.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रविवारी जिल्हा दौरा असून, त्यांच्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षेसह एएसएल वर्गवारी आहे. ते कोल्हापूर विमानतळ, अंबाबाई मंदिर, एस.एम. लोहिया हायस्कूल, नागाळा पार्क येथील सभा, छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी चौक, हॉटेल पॅव्हेलियन या ठिकाणी जाणार आहेत. संरक्षित व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानतळ व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास बंदी असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. अमित शाह ज्या-ज्या परिसरामध्ये कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्या परिसरातील नागरिकांना उद्या घराबाहेर पडायचे असेल तर त्यासंबंधी माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. इतकच नाही तर आधार कार्ड झेरॉक्स सुद्धा पोलिस ठाण्यात जाऊन जमा करावे लागणार आहेत. विनाकारण घराबाहेर पडता येणार नाहीये. याबाबत कोल्हापूर पोलिसांनी आदेशच काढला आहे.
Amit Shah visit to Kolhapur: कोल्हापूरकरांना घराबाहेर पडतानाही द्यावी लागणार पोलिसांना माहिती, ड्रोनवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 18:46 IST