अंबाबाईच्या पूजेचा ‘इव्हेंट’

By Admin | Updated: November 25, 2014 23:54 IST2014-11-25T23:21:04+5:302014-11-25T23:54:24+5:30

भाविकांसाठी सजावटीचे स्थळ : श्रीपूजकांकडून वैविध्यपूर्ण पूजा

Ambabai's Pooja 'Event' | अंबाबाईच्या पूजेचा ‘इव्हेंट’

अंबाबाईच्या पूजेचा ‘इव्हेंट’

इंदुमती गणेश - कोल्हापूर -जगत्जननी अंबाबाईचे मूळ स्वरूप म्हणजे तिची खडी पूजा. मात्र, गेल्या वर्षभरात कधी ‘अन्नपूर्णा’, कधी ‘सरस्वती’बरोबरच विविध औचित्यानुसार विविध देवतांच्या रूपात अशा सरासरी आठवड्याला किमान दोन दिवस देवीची वैविध्यपूर्ण रूपात पूजा बांधली जाते. त्यामुळे पूजेचे नाविन्य राहत नाहीच शिवाय भाविकांना देवीच्या मूळ स्वरूपाचे नव्हे, तर श्रीपूजकांच्या संकल्पनेतील देवीचे दर्शन घडते. त्यामुळे मूर्तीला धोका पोहोचतो तो वेगळाच.
दुसरीकडे श्रीमंत भाविकांच्या वाढदिवसांपासून ते वेगवेगळ्या समारंभाच्या निमित्ताने सजावटी, देखाव्याचे एक स्थळ म्हणून मंदिराचा वापर होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात रोजच एक ‘इव्हेंट’ होत आहे.
करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रूपात पूजा बांधणे हे काही साधे सोपे काम नव्हेच. त्यामागे शास्त्रीय, धार्मिक आधार असावा लागतो. पूर्वी जेव्हा
माहिती-तंत्रज्ञानाचा प्रसार झाला नव्हता, त्यावेळीदेखील परंपरागत श्रीपूजक देवीची फुला-पाना-फळातील पूजा बांधत असत. आता इंटरनेटद्वारे जगभरातील शक्तिस्थानांची माहिती मिळते, डिजिटायझेशनसारखे तंत्रज्ञान आले आहे, त्यानुसार पूजा बांधणीतही अधिक आकर्षता आणि
भव्य-दिव्यता आली आहे.
नवरात्रौत्सवात तर या पूजा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. मात्र, वैविध्यपूर्ण पूजा सातत्याने दिसू लागल्या की त्यात नाविन्य राहत नाही, असेच काहीसे अंबाबाईच्या पूजांचे झाले आहे. वैविध्यपूर्ण पूजा नित्याच्याच झाल्याने देवीचे साध्या रूपात दर्शन घडणे हीच आता वेगळी पूजा झाली आहे. सण-वाराचे दिवस मान्य केले, तरी गेल्या दोन वर्षांत इतरवेळी कारण नसतानाही अशा वैविध्यपूर्ण पूजा बांधल्या गेल्या आहेत.
हक्कदार श्रीपूजकांची एकूण चाळीस घराणी आहेत. काही जणांच्या वाट्याला एक-दोन वर्षांनी एकदा आठवडा येतो. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या आठवड्याचे वेगळेपण म्हणून देवीची वैविध्यपूर्ण पूजा बांधण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. मात्र, या सगळ्या पूजांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भार अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर पडतो. देवीच्या मूर्तीची सद्य:स्थिती पाहता त्याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे.


सजावटी, देखावे
एखाद्या श्रीमंत भाविकाचा वाढदिवस असला की, देवीसाठी काहीतरी करायचं, या अनावर भावनेतून मंदिरात फुलांची सजावट केली जाते. कधी मिठाईवाले, कधी फळ-फुलांचे व्यापारी, कधी भाविकांचा अट्टाहास म्हणूनही मंदिरात देखावे केले जातात. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेला वेठीला धरले जाते. शिवाय भाविकांना देवीचे दर्शन व्यवस्थित घेता येत नाही ते निराळेच. पण, फुलांमधून येणारे लहान-मोठे कीटक, निर्माल्य या सगळ्या गोष्टी मंदिराच्या बांधणीवर परिणाम करतात. मंदिर हे भाविकांच्या श्रीमंतीचा किंवा अन्य कोणत्याही देखाव्याचा डामडौल मिरविण्याचे ठिकाण नाही याचे भान राखले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी देवस्थानने काही नियम, अटी लादल्या पाहिजेत.

अंबाबाईच्या मूर्तीची अवस्था आता सर्वश्रृत आहे. देवीच्या मूर्तीवर कोणताही भार न टाकता बांधली गेलेली पूजा एकवेळ ठीक आहे; पण अनेकदा देवीला आठ हात, किंवा बैठी, हातात काही धारण केलेली अशा कोणत्याही रूपात अलंकारिक पूजा बांधली की त्याचे वजन देवीच्या मूर्तीवर पडते. मूर्तीची काळजी घेऊन पूजा बांधल्या जाव्यात. - उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासक


पूर्वी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती. शिवाय नवरात्रात सगळ्याच भाविकांना दर्शनासाठी येता येत नाही. त्यामुळे सणावाराला किंवा इतरवेळी देवीची वैविध्यपूर्ण पूजा बांधली की परस्थ: भाविकाला दर्शनाचा आनंद मिळतो शिवाय पूजा बांधताना मूर्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो. - केदार मुनिश्वर, श्रीपूजक

Web Title: Ambabai's Pooja 'Event'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.