कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईने माझे चांगले केले, देवीने माझी झोळी भरली..तर त्यातील मूठभर देवीच्या चरणी वाहण्याची भावना वाढीस लागली आहे. त्यातूनच अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या तीन वर्षात ३५ कोटी १८ लाख ३४ हजार इतक्या उत्पन्नाची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम मागील वर्षी सन २०२३-२४ मध्ये आली आहे.श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ गेल्या दहा वर्षात वाढला असून वर्षाला सरासरी ३० लाखांवर भाविक मंदिराला भेट देतात. देवीला नवस बोलण्याची प्रथा नाही. परंतु भक्तगण येताना कधीच रिकाम्या हाताने येत नाही. आई अंबाबाईच्या कृपेने आयुष्यात सगळे चांगले घडले म्हणून स्वखुशीने देवीची ओटी भरण्याची भावना असते. त्यातूनच सोन्या-नाण्यापासून अनेक वस्तूंचे भाविक दान करतात. त्यामुळे देवीच्या खजिन्यात येणाऱ्या देणगीच्या रकमेतही घसघशीत वाढ झाली आहे. वर्षागणिक हा आकडा वाढत असून मागील तीन वर्षात तो कमी जास्त रकमेच्या फरकाने स्थिर आहे. मंदिर परिसरात ठिकठिकाणी देवस्थान समितीच्या १३ ते १४ दानपेट्या आहेत. दर महिना- दोन महिन्याला पेटीतील रक्कम काढली जाते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोजणीत १ कोटी ७९ लाखांच्या रकमेची अधिकची भर देवीच्या खजिन्यात पडली होती.उत्पन्नाप्रमाणेच खर्चही..अंबाबाई मंदिराचे उत्पन्न वाढलेले दिसत असले तरी त्या प्रमाणात खर्चदेखील आहे. या मंदिरावरच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अर्थकारण अवलंबून आहे. लाईट बिल, पाणी बिलापासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंतचे सगळे खर्च या उत्पन्नातून भागवले जातात. अंबाबाई पाठोपाठ जोतिबा देवस्थानला चांगले उत्पन्न मिळते मात्र ही रक्कम अंबाबाईच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे.
मागील तीन वर्षातील आकडेवारीसन : दान पेटीतील उत्पन्न
- २०२२-२३ : ११ कोटी २४ लाख ७३ हजार ७६१
- २०२३-२४ : १२ कोटी १४ लाख ५९ हजार ९६१
- २०२४-२५ : ११ कोटी ७९ लाख ००, ३००
- एकूण : ३५ कोटी १८ लाख ३४ हजार ०२२
मागीलवर्षी रक्कम कमी कशी?दरवर्षी देणगी पेटीतील रक्कम वाढत्या क्रमाने असते मात्र २०२३-२४ मध्ये १२ कोटी १४ लाख आणि चालूवर्षी ११ कोटी ७९ लाखांची रक्कम देवस्थानच्या नोंदीत आहे. याबाबत चौकशी केली असता देणगी आलेल्या पेट्या माेजण्यासाठी कधी काढल्या जातात त्यावरदेखील हे अवलंबून असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले .