remdesivir Kolhapur : रेमडेसिविरचा कंपन्यांकडून पुरवठा तरी नातेवाईक वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 13:02 IST2021-05-12T13:00:37+5:302021-05-12T13:02:31+5:30
remdesivir Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा होत असतानादेखील त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. आपला माणूस वाचावा म्हणून नातेवाईक धावपळ आणि जीवाचे रान करत नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी करत आहेत, वस्तुस्थितीत मात्र काही रुग्णालयांकडूनच इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.

remdesivir Kolhapur : रेमडेसिविरचा कंपन्यांकडून पुरवठा तरी नातेवाईक वेठीस
कोल्हापूर : जिल्ह्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा होत असतानादेखील त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. आपला माणूस वाचावा म्हणून नातेवाईक धावपळ आणि जीवाचे रान करत नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी करत आहेत, वस्तुस्थितीत मात्र काही रुग्णालयांकडूनच इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.
कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. येथे सर्व रुग्णालयांकडून रोज इंजेक्शनची मागणी केली जाते.
दिवसाला २ हजार इंजेक्शनची मागणी असताना १०० ते २०० च्या पटीत त्यांचा पुरवठा होत आहे. त्यातूनच सर्व रुग्णालयांना तो पाठवला जातो. एकीकडे रात्रंदिवस नियंत्रण कक्षाकडून ही सेवा बजावली जात असताना दुसरीकडे काही रुग्णालयांमधून साठेबाजी होत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्यावर्षी रेमडेसिविरची मागणी सुरू झाल्यानंतर अनेक मोठ्या रुग्णालयांनी थेट इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली होती. त्यांना कंपनीकडून कोडनंबरदेखील देण्यात आला आहे. अशारीतीने रोज या रुग्णालयांना ३० ते ४० इंजेक्शनचा थेट पुरवठा केला जातो. याची यादी रोज जिल्हा प्रशासनाकडे येत असते. असा थेट पुरवठा होत असतानादेखील रुग्णालयांकडून नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी केली जाते.
नियंत्रण कक्षाकडून वैयक्तिकरीत्या इंजेक्शनचा पुरवठा केला जात नसताना रुग्णाच्या नातेवाइकांना इंजेक्शन आणण्यासाठी पळवले जाते. नातेवाईक नियंत्रण कक्षाकडे ही चिठ्ठी घेऊन येतात व इंजेक्शन मिळवण्यासाठी याचना करत असतात. नाहीतर मग काळ्याबाजारातून त्याची खरेदी होते किंवा मग रुग्णालयाकडूनच ते जास्त रकमेने विकत दिले जाते. नियंत्रण कक्षाला केवळ ३ टक्के इतका रेमडेसिविरचा पुरवठा होत आहे.
अशा परिस्थितीत ज्या रुग्णालयांना थेट कंपनीकडून पुरवठा होत नाही त्यांना इंजेक्शन देण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे असताना मोठ्या रुग्णालयांकडून इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.