Although he recovered from corona, he needs rest: Rituraj Patil: I will be working with new vigor soon | कोरोनातून बरे झाला, तरी विश्रांती गरजेची : ऋतुराज पाटील : लवकरच नव्या जोमाने कार्यरत होईन

कोरोनातून बरे झाला, तरी विश्रांती गरजेची : ऋतुराज पाटील : लवकरच नव्या जोमाने कार्यरत होईन

ठळक मुद्देकोरोनातून बरे झाला, तरी विश्रांती गरजेची : ऋतुराज पाटील लवकरच नव्या जोमाने कार्यरत होईन

कोल्हापूर : कोरोनाची काहींना सौम्य, तर काहींना तीव्र लक्षणे असतात. काहीजणांमध्ये ती दिसून येतात. काहींमध्ये ती दिसून येत नाहीत. माझ्याबाबतीत म्हणाल, तर २२ दिवसांनंतर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. माझा एचआरसीटी स्कोअर हा १९ होता. त्यामुळे माझी लक्षणे ही तीव्र स्वरूपाची होती. अशा परिस्थितीत निगेटिव्ह रिपोर्ट आला असला, तरी काळजी घेणे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. कोरोनाला कोणीही लाईटली घेऊ नये, असा सल्ला आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी (दि. १५) दिला.

कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच्या तीन आठवड्यांतील अनुभव आमदार पाटील यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितला. ज्या प्रकारची लक्षणे त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपापली काळजी घ्यावी. जे कोरोनातून यशस्वी होऊन बाहेर पडले आहेत, त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर लगेच जोराने कामाला लागू नये. कोरोनाचा विषाणू जरी गेला असला तरी फुप्फुसाला पूर्ण रिकव्हर व्हायला वेळ द्यावा लागतो.

असा वेळ न दिल्याने निगेटिव्ह आल्यावरही पुन्हा ॲडमिट व्हायच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. हे टाळायचे असेल तर पूर्ण विश्रांती घेणे हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. सकस आहार, पॉझिटिव्ह थिंकिंग, मन:स्वास्थ्य, औषधे ही कोरोनाला हरवायची चार मोठे शस्त्रे आहेत. त्यांचा नीट वापर केल्यास कोरोनामुक्त होता येते.

कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही; त्यामुळे आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊन ही लढाई लढली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, शक्य तेवढे गर्दीत जाणे टाळणे, प्रशासनाच्या सूचना पाळून प्रशासनाला सहकार्य करणे, हे गरजेचे आहे. मीही लवकरच नव्या जोमाने फिल्डवर कार्यरत होईन, असेही त्यांनी सांगितले.

मनाची घालमेल करणारी स्थिती

कोरोनाच्या या काळात मी, माझा भाऊ पृथ्वीराज एकाच वेळी पॉझिटिव्ह होतो. जवळचे १५ पाहुणे, घरातील काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने आई, वडील, आजी वेगळ्या रूममध्ये होती आणि याच वेळी माझा पाच महिन्यांचा छोटा मुलगा अर्जुनला घेऊन धीराने परिस्थितीला पूजा सामोरी जात होती. यामुळे मनाची घालमेल करणारी स्थिती अनुभवली. पण आई, वडील यांचा खंबीरपणा, राज्य आणि जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारे बंटीकाका यांचे उपचारांवरील बारीक लक्ष यांमुळे या कठीण काळातून बाहेर पडल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Although he recovered from corona, he needs rest: Rituraj Patil: I will be working with new vigor soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.