कोल्हापूर : एकीकडे खोट्या पत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे वैद्यकीय साहित्य पुरवले जात असलेल्या सीपीआरमधील लिपिक आणि शिपाई पदाच्या नोकऱ्यांचेही बोगस आदेश काढण्यात येऊ लागले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या सह्या असलेले दोन असे आदेश मिळाले असून याबाबत महाविद्यालय प्रशासनाने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यातीलच या रुग्णालयाच्या कारभारावर आणि बाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली आहे. ही पत्रे ‘नागेश कांबळे’ यांनी दिली आहेत, असे त्या युवक, युवतीने सांगितले. आता हा कांबळे कोण, हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.
- गायत्री जयवंत वारके यांना लिपिकपदी तर दिलीप गणपती दावणे यांना शिपाई पदावर सीपीआरमध्ये नियुक्त घ्यावे, अशी शिफारस आयुक्त, जिल्हा विभाग रुग्णालय कोल्हापूर यांना करण्यात आली असून यावर येडगे आणि मोरे यांच्या सह्या आहेत.
- ही पत्रे घेऊन हे दोघेही सीपीआरमध्ये आले. त्यांनी हे पत्र दिल्यानंतर प्रशासन अधिकारीही अचंबित झाले. कारण शासकीय नियुक्ती आदेशाचा नमुना ठरलेला असतो. या पत्रांवर हाताने तारीख लिहिली असून त्यावर जावक क्रमांक नाही.
- कार्यालयीन अधीक्षक अनुष लोखंडे आणि तंत्रज्ञ शिवाजी जाधव यांना या पत्रांबाबत संशय आल्याने त्यांनी या मुलांसह नातेवाइकांसह अधिष्ठाता मोरे यांची भेट घेतली. तेव्हा ही पत्रे बोगस असल्याचे स्पष्ट झाले.
पैसे घेऊन अनेकांना पत्रांची शक्यताअशा पद्धतीने पैसे घेऊन बोगस नियुक्तीपत्रे अनेकांना दिली असण्याची शक्यता यानिमित्त व्यक्त होत आहे. मुळात आयुक्त जिल्हा विभाग कोल्हापूर असे पदच कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात नसताना त्यांच्या शिफारशीचे हे बोगस पत्र देण्यात आले. पोलिसांनी ज्यांच्याकडे हे पत्र मिळाले त्या वारके आणि दावणे यांची चौकशी करून त्यांना ही पत्रे कोणी दिली हे उघडकीस आणण्याची गरज आहे. अशा पद्धतीने कोणी नियुक्तीपत्रे देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. मोरे यांनी केले आहे.