दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापुरात 'या' परिसरात होतो सोने लुटण्याचा मोठा सोहळा
By संदीप आडनाईक | Updated: September 20, 2025 18:14 IST2025-09-20T17:53:20+5:302025-09-20T18:14:43+5:30
पंचगंगेवर अंबाबाई-रंकभैरवाची पालखी भेट, जप्तनमुलुख-जाधव यांच्याकडे मान

दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापुरात 'या' परिसरात होतो सोने लुटण्याचा मोठा सोहळा
संदीप आडनाईक
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवासोबतच ‘कोल्हापूरचा रक्षक’ म्हणजे क्षेत्रपाल रंकभैरवाच्या नवरात्रोत्सवालाही मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. दसरा चौकातील शाही दसऱ्यासोबतच कोल्हापूरकरांना माहिती नसलेला हा सोने लुटण्याचा मोठा सोहळा शहाजी वसाहतीमधील गंजी माळावर म्हणजे आजच्या टिंबर मार्केट परिसरातही थाटात साजरा होतो.
अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेला महालक्ष्मी बँकेसमोरच्या छोट्या बोळात सातव्या-आठव्या शतकातील श्री रंकभैरव स्वतंत्र तटबंदी युक्त हेमाडपंथी शैलीतील मंदिरात विराजमान आहे. दहाव्या पिढीतले राहुल जप्तनमुलुख-जाधव हे या मंदिराचे सध्या व्यवस्थापन पाहतात. करवीरचे श्रीमंत छत्रपती महाराज यांच्या राजवटीतील सरदार रेखुजी बिन नरसोजीराव जाधव-जप्तनमुलुख यांनी लढाईत मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांना जप्तनमुलुख आणि सरनोबत हे दोन किताब मिळाले. त्यामुळे दसऱ्याच्या सोहळ्याचा मान 'जाधव-जप्तनमुलुख' घराण्याला आहे.
रंकभैरवाचा नवरात्राैत्सव
रंकभैरवाचा नवरात्रीत विशेष उत्सव असतो. देवाचा पालखी सोहळा अश्विन शुद्ध पंचमीला सुरू होतो. महाअष्टमीच्या दिवशी देवीचा रोशन नाईक चोपदार देवीचा सुवर्णदंड घेऊन रंकोबा पुढे येऊन अंबाबाईची ललकारी देतो नंतर रंकनाथ सदरेवरून मंदिरात येतात. महानवमीला रंकभैरव स्वतःच्या तीर्थात म्हणजे रंकाळ्यात स्नान करतात. दसऱ्या दिवशी अंबाबाईची आणि भवानीची पालखी दसरा चौकाकडे निघते. त्याचवेळी रंकभैरवाची पालखी गंजीमाळाकडे निघते.
दगडी तख्तावर धार्मिक विधी
रंकभैरवाची पालखी टिंबर मार्केट परिसरातील भुजंगा लक्ष्मण काशीद यांनी १९३१ मध्ये बांधलेल्या रंकभैरवाच्या दगडी सदरेवर (तख्त) जाऊन थांबते. तेथे धार्मिक विधीनंतर एका घराच्या छतावरून आपट्याच्या पानाच्या छोट्या फांद्या भाविकांकडे फेकल्या जातात. भाविक तीच पाने सोन्याचे प्रतीक म्हणून लुटतात.
अंबाबाई-रंकभैरव भेटीचा मार्ग
रंकभैरव मंदिर - मिरजकर तिकटी - नंगीवली चौक - टिंबर मार्केट - उभा मारुती चौक - रंकाळा/राजघाट- उत्तरेश्वर पेठ - पंचगंगा नदी - गंगावेश - बाबूजमाल दर्गा - वांगी बोळ- बिनखांबी गणेश मंदिर चौक आणि पुन्हा श्री रंकभैरव मंदिरात आगमन अशी पालखी निघते. पंचगंगा नदीवर गुरू महाराज समाधी मंदिराजवळ अंबाबाईशी त्यांची भेट होते. त्यानंतर पालखी पुन्हा मंदिराकडे आल्यानंतर नवरात्रौत्सवाची सांगता होते.