दुकानांना परवानगी द्या, नाहीतर रस्त्यावर उतरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:45+5:302021-06-09T04:30:45+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने लागू केलेल्या निकषामुळे जिल्ह्यात या आठवड्यातदेखील दुकाने उघडता येणार नाहीत, हा निर्णय चुकीचा असून, रुग्णसंख्या ...

दुकानांना परवानगी द्या, नाहीतर रस्त्यावर उतरु
कोल्हापूर : राज्य शासनाने लागू केलेल्या निकषामुळे जिल्ह्यात या आठवड्यातदेखील दुकाने उघडता येणार नाहीत, हा निर्णय चुकीचा असून, रुग्णसंख्या कमी नाही झाली तर आणखी किती दिवस लॉकडाऊन वाढवून सरकार व्यापाऱ्यांना वेठीस धरणार आहे, आता सरसकट दुकाने सुरू करू द्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सोमवारी झालेल्या बैठकीद्वारे दिला. संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संचालक आनंद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
शेटे म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून व्यापारावर फार मोठा परिणाम झालेला असल्याने बहुतेक व्यापाऱ्यांचे भांडवल संपलेले आहे. दोन महिने घरी बसल्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिघडले आहे. तेव्हा व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू.
गेली दोन महिने अत्यावश्यक व जीवनावश्यक सोडून इतर व्यवसाय बंद आहे. शासनाने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने केवळ जीवनावश्यक व्यवसायाला सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत मुभा दिली आहे. कोल्हापूरमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा तसेच कर्नाटकातील २५०हून अधिक रुग्ण सेवा घेत आहेत. त्यामुळे येथील पॉझिटिव्ह रेट लगेच कमी होणार नाही. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या कमी आहे. ती वाढवून मृत्यूदर कमी करण्यास प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मते बैठकीत व्यक्त झाली.
यावेळी सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, इलेक्ट्रीकल मर्चंटस्चे अध्यक्ष अजित कोठारी, ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचे अध्यक्ष प्रवीण शहा, इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर अगरवाल यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस विविध व्यावसायिक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
---
फोटो नं ०७०६२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स
ओळ : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सोमवारी झालेल्या बैठकीत दुकानांना परवानगी न दिल्यास आंदोलनासाठी रस्त्यावर उतरु, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--
---