प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: February 20, 2015 23:32 IST2015-02-20T23:07:51+5:302015-02-20T23:32:17+5:30
‘एव्हीएच’प्रकरण : हवा प्रदूषणाची तपासणी न केल्याने आंदोलन

प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांना घेराव
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेला एव्हीएच केमिकल प्रकल्पातून काळा धूर येत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने प्रकल्पाच्या तपासणीसाठी आज, शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथकाला बोलावले होते. मात्र धूर येत नसल्याने परत निघालेल्या पथकाला संतप्त जमावाने घेराव घातला. या प्रकल्पातून काळा धूर येत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने प्रकल्पाची तपासणीसाठी आज, शुक्रवारी कोल्हापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी प्रकल्पस्थळी सायंकाळी ६.३० वाजता बोलावले होते. मात्र, एव्हीएच बंद असल्यामुळे कंपनीच्या चिमणीतून काळा धूर न दिसल्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना काही तपासणी करता आली नाही. त्यामुळे गाडीमधून आणलेली यंत्रसामुग्री परत घेऊन जाऊ लागले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक आनंद कामोजी यांनी प्रकल्प सुरू आहे. मात्र, उत्पादन न घेता ट्रायल घेत आहोत. त्यामुळे कदाचित धूर येत असेल, असे सांगितले.
प्रदूषण मंडळाचे अधिकारी मनीष होळकर यांनी कंपनी सुरू झाल्याशिवाय परिसरातील हवा तपासता येणार नाही. ज्यावेळी कंपनी सुरू होईल त्यावेळी परिसरातील हवा तपासून हवेतील प्रदूषणाचे नमुने शासनाकडे पाठवू असे सांगितले. यावेळी संतप्त जमावाने त्यांना घेराव घालून एव्हीएच प्रकल्पामध्ये मुक्काम राहून प्रकल्पातून निघणाऱ्या धुराचे नमुने तपासा, अशी मागणी केली. मात्र, यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी त्यांच्या पद्धतीने काम करू द्या म्हणून मध्यस्थी केली.
प्रदूषण मंडळाच्या अधिकारी वर्षा कदम, प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख महादेव गावडे, शांता जाधव, नीलेश कोठारी, अॅड. संतोष मळवीकर, पांडुरंग बेनके, अशोक कांबळे, अजिंक्य बिरंजे, सुधीर राणे, प्रसाद आडनाईक, प्रमोद पाटील, संजय पाटील, शिवाजी सावंत, आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)