Maharashtra Vidhan Sabha 2019 : मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:40 IST2019-10-04T13:36:55+5:302019-10-04T13:40:04+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतून ६६ उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी ९४ अर्ज दाखल केले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नवरात्रौत्सवातील पाचवी माळ असल्याने बहुतांश उमेदवारांनी मुहूर्तावर अर्ज दाखल केले. १० पैकी पाच मतदारसंघांत युतीला बंडखोरीचा सामना करावा लागेल, असे आजचे चित्र आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतून ६६ उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी ९४ अर्ज दाखल केले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नवरात्रौत्सवातील पाचवी माळ असल्याने बहुतांश उमेदवारांनी मुहूर्तावर अर्ज दाखल केले. १० पैकी पाच मतदारसंघांत युतीला बंडखोरीचा सामना करावा लागेल, असे आजचे चित्र आहे.
अर्ज दाखल केलेल्यांत आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, स्वाभिमानी पक्षाकडून अनिल मादनाईक, संग्राम कुपेकर यांच्यासह कागलमधून भाजपच्या समरजित घाटगे यांनी, तर चंदगडमधून गोपाळराव पाटील यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी सायकलवरून जाऊन अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करताना अनेकांनी हजारो लोकांना रस्त्यांवर आणून शक्तिप्रदर्शन केले. हलगीचा कडकडाट, उमेदवारांचा जयजयकार, मोटारसायकल रॅली, फडफडणारे राजकीय पक्षांचे झेंडे यांमुळे सगळीकडे वातावरण राजकारणमय बनून गेले होते. कागल मतदारसंघात प्रमुख तीन उमेदवारांनी एकाच दिवशी अर्ज दाखल केल्याने तिथे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. एकाच वेळी नवरात्रौत्सवासाठी आलेले भाविक आणि अर्ज दाखल करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते यांमुळे शहर फुलून गेले.