‘गोकुळ’चा सर्वच टेम्पोधारकांना दम
By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:17:22+5:302014-11-29T00:30:27+5:30
दारू वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे बिल गोठवणार

‘गोकुळ’चा सर्वच टेम्पोधारकांना दम
कोल्हापूर : मद्याची वाहतूक करताना दुधाचा टेम्पो सापडल्याने ‘गोकुळ’ची संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आज, शुक्रवारी अध्यक्ष व संचालकांनी सर्वच ठेकेदारांना बोलावून दम दिला असून, असा प्रकार करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा संघ व्यवस्थापनाने परिपत्रक काढून दिला आहे.
कणेरीवाडी (ता. करवीर) येथे काल, गुरुवारी दुधाच्या टेम्पोतून विदेशी मद्याची वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला होता. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्णात खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी टेम्पोसह सुमारे नऊ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. यासंबंधी संदीप पाटील व अमित पाटील यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल ‘गोकुळ’ प्रशासनाने घेतली असून, संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय आज संचालकांनी घेतला. त्याचबरोबर या ठेकेदाराचे बिल न देण्याचा निर्णयही संचालकांनी घेतला आहे.
असे प्रकार पुढे होऊ नयेत, यासाठी सर्वच ठेकेदारांना बोलावून घेऊन त्यांना कडक शब्दांत सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी दूध वाहतूक करणाऱ्या टॅँकरांसह स्थानिक दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकांनाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात रोज हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
संबंधित ठेकेदाराचा ठेका आज रद्द केला आहे. त्याचबरोबर त्याचे वाहतुकीचे बिलही गोठविण्यात आले आहे. इतर ठेकेदारांनाही कडक शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत.
- दिलीप पाटील
(अध्यक्ष, गोकुळ)