टोलला टोला देण्याचा सर्वपक्षीय निर्धार
By Admin | Updated: March 20, 2016 00:18 IST2016-03-20T00:18:48+5:302016-03-20T00:18:48+5:30
पालकमंत्र्यांना निवेदन देणार : सांगली-कोल्हापूर रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची मागणी

टोलला टोला देण्याचा सर्वपक्षीय निर्धार
सांगली : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात केंद्र शासनाने सांगली-कोल्हापूर रस्त्याचा समावेश करून टोल रद्द करावा किंवा राज्य शासनाने रस्त्याचा खर्च करावा, अन्यथा टोल विरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा सांगलीतील सर्वपक्षीय बैठकीत शनिवारी देण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवार, दि. २० मार्च रोजी याप्रश्नी निवेदन देण्यात येणार आहे .
सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील टोलला विरोध करण्यासाठी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. निमंत्रक महापौर हारुण शिकलगार व वाहतूकदार संघटनेचे नेते बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सर्वपक्षीय बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, भाजपच्या नीता केळकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, राष्ट्रवादीचे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, अंकलीचे सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे, मदन पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर उपस्थित होते .
महापौर शिकलगार म्हणाले की, सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील टोलविरोधात आता आक्रमक लढा उभारण्यात येणार आहे. शासनाने या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून हा रस्ता टोलमुक्त करावा किंवा या ठेकेदाराचे काम पूर्ण करून शासनाने त्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी रविवारी पालकमंत्र्यांकडे करणे आवश्यक आहे. सर्वांनी हा निर्णय मान्य करत रविवारी दुपारी चार वाजता येथील सर्किट हाऊसवर पालकमंत्र्यांची भेट घेऊन टोल रद्दची मागणी करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कोल्हापूर येथील टोल रद्द करण्यासाठी ४५० कोटी रुपये शासन देणार आहे. त्या धर्तीवर हा टोल रद्द करण्यासाठी शासनाने १६२ कोटी रुपये द्यावेत. केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याला टोल लावणार नाही, असे आश्वासन सांगलीत दिले होते. ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
नीता केळकर म्हणाल्या, नितीन गडकरी यांनी टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे याचा पाठपुरावा केल्यास निश्चित टोल रद्द होईल. अंकलीचे सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे यांनी दोन दिवसात होणाऱ्या ग्रामसभेत टोलविरोधात ठराव घेणार असल्याचे जाहीर केले.
आरपीआयचे सुरेश दुधगावकर, मनसेचे तानाजी सावंत यांनीही मते मांडली.
बैठकीला शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले, एस. टी. कामगार संघटनेचे नेते बिराज साळुंखे, सांगली चेंबरचे अध्यक्ष गोपाळ मर्दा, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी, प्रशांत पाटील-मजलेकर, नगरसेवक युवराज गायकवाड, विष्णू माने, राजू गवळी, पांडुरंग भिसे, लालू मेस्त्री तसेच शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. झाडांचे गणित : ठेकेदाराकडून चुकले
अॅड. अमित शिंदे म्हणाले, शास्त्री चौक ते अंकलीपर्यंतचा रस्ता डीपीमध्ये ३० मीटर असताना महापालिकेने ३५ मीटरच्या रस्त्याची परवानगी दिली आहे. तसा ठरावदेखील केला आहे. प्रथम हा ठराव रद्द करणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीतील सुमारे ५९२ झाडे या ठेकेदाराने तोडली आहेत. एका झाडामागे पाच झाडे लावण्याचे आदेश असताना त्यांनी अद्याप एकही झाड लावलेले नाही. शिवाय अद्याप भूसंपादन केले गेले नाही. यामुळे कायद्यानुसार ठेकेदाराला टोलवसुली करता येत नसल्याचा मुद्दा शिंदे यांनी मांडला.