अक्षता माने यांना वाढदिवसाला मिळाली लसीकरणाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:46 IST2021-01-16T13:43:49+5:302021-01-16T13:46:48+5:30
Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना वाढदिवसादिवशी लसीकरणाची भेट मिळाली. माने या सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या.

अक्षता माने यांना वाढदिवसाला मिळाली लसीकरणाची भेट
कोल्हापूर - येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना आज, शनिवारी वाढदिवसादिवशी लसीकरणाची भेट मिळाली. माने या सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. कोल्हापूर शहरात महापालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी १० वाजल्यापासून लसीकरण करण्यात आले. महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज होती.
येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात लसीकरणानंतर लाभार्थी माने यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रमाणपत्र वितरण केले. यावेळी बावडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उमेश कदम आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या लसीकरणास आमदार चंद्रकांत जाधव, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. अशोक पोळ, डॉ. अमोल माने यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, महाडिक माळ, राजारामपुरी व सदर बाजार नागरी सुविधा केंद्र येथील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यामध्ये लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवरील महापालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. डॉ. अमोल माने यांनी सांगितले कि, महापालिकेकडे लस ठेवण्यासाठी १२ शीतसाखळी केंद्रे आहेत. त्यापैकी एक मुख्य लसीकरण शीतसाखळी केंद्र सज्ज आहे.
शिरोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. राजेश जाधव हे या केंद्रावर पहिले लाभार्थी ठरले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, नगराध्यक्ष अमरसिंह माने माजी आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते.लसीकरणानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुष्प देवून लाभार्थ्यांचा सत्कार केला.